ठाकरे बंधूनंतर आता अजितदादा-शरद पवार ही एकत्र येणार ?

0
144
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमची भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र मोठा आहे, असं म्हणत भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते, अशी भावना व्यक्त केलीय. त्याला खुद्द उद्धव ठाकरे यांनीच सकारात्मक प्रतिसाद दिलाय. असे असतानाच आता पवार घराणेही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा चालू झाली आहे. कारण याच घराण्यातील एका बड्या नेत्याने अप्रत्यक्षपणे अजितदादांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय.

सर्वच कुटुंबांनी एकत्र यावं- रोहित पवार

पवार घराण्यातील बडे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी एक एक्स या समाजमाध्यमावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी एक ट्वीट केलंय. विशेष म्हणजे आपली ही पोस्ट त्यांनी अजित पवार यांना टॅग केली आहे. अजित पवार यांचा उल्लेख न करता त्यांनी सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेनंतर रोहित पवार यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित पवार यांनी नेमंक काय म्हटलंय?

रोहित पवार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल, तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच सर्वच कुटुंबांनी या शब्दावर त्यांनी हॅशटॅग लावत विशेष जोर दिला आहे. सोबतच या पोस्टमद्ये त्यांनी शरद पवार, अजित पवार यांनाही टॅग केलंय. त्यामुळे रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांना एकत्र येण्याचंच आवाहन केल्याचं म्हटलं जात आहे.

सुप्रिया सुळे यांचेही सूचक विधान

सुप्रिया सुळे यांनीदेखील पवार कुटुंब एकत्र येणार का? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देताना ‘पांडुरंगाची इच्छा आहे. नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आजही आणि उद्याही,’ असे सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

दरम्यान, आता रोहित पवार यांच्या या ट्वीटचे वेगवेगळे अर्थ काढले जात असले तरी ठाकरे बंधूंसोबतच भविष्यात राजकीय दृष्टीकोनातून पवार कुटुंब एकत्र येणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

—————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here