कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
आज १८ एप्रिल समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि नारीमुक्तीचे अग्रदूत महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती.
त्यांचा जन्म १८५८ मध्ये झाला, पण विचार होते शतकांआधीचे आणि पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा शिरवली गावात जन्मलेला धोंडो, वयाच्या १४ व्या वर्षी पुण्यात आले. शिक्षणात प्राविण्य मिळवलं आणि गणित विषयात प्रोफेसर झाले. पण समाजातल्या जखमांवर औषध देण्यासाठी त्यांनी शिक्षणाचं माध्यम बनवलं!
१८९६ साली, जेव्हा विधवांना पुन्हा लग्न करण्याचा विचारही पाप समजला जात होता, तेव्हा कर्वे यांनी स्वतः एक विधवा स्त्रीशी विवाह केला — ही केवळ सामाजिक क्रांती नव्हे, तर एक सुसंस्कृत उठाव होता.
१९१६ मध्ये त्यांनी पुण्यात हिंदू विधवा पुनर्विवाह संघ सुरू केला आणि स्नातक कन्यांसाठी ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (SNDT) ची स्थापना केली. भारतातले पहिले महिला विद्यापीठ!
“मुलगी शिकली, प्रगती झाली” – ह्या विचाराचा मूळ जनक!
त्यांनी केवळ शिक्षण दिलं नाही, तर स्त्रियांना आपली ओळख, आत्मसन्मान आणि स्वतंत्रता दिली. एकेकाळी जिथे विधवांना अस्पृश्य मानलं जायचं, तिथे त्यांनी त्यांना शिक्षणाच्या सिंहद्वारात आणलं.
पद्मविभूषण, भारतरत्न – पण त्यांचं खरं पारितोषिक होतं समाजाचा बदललेला दृष्टिकोन.
महर्षी कर्वे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते – ते एक चळवळ होते.
एक विचार… जो आजही जिवंत आहे, प्रत्येक स्त्रीच्या शिक्षणात, प्रत्येक विधवा स्त्रीच्या नव्या सुरुवातीत!
आज त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा करूया.
त्यांच्या धैर्याचा, विचारांचा, आणि क्रांतिकारकतेचा वारसा पुढे नेऊया!
“महर्षी कर्वे” – ज्यांनी भारतात स्त्रीशिक्षणाचं दार उघडलं…
त्यांना शतशः नमन!
———————————————————————————-



