कोल्हापूर : प्रसामाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात आठ तालुक्यात नव्या बाजार समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड व आजरा या तालुक्यात बाजार समित्या होणार आहेत. त्यासाठी सरकारी जमिनी नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल योग्य दरात आणि थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम विपणन व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बाजार समिती योजने अंतर्गत राज्यातील २१ जिल्ह्यातील ६५ तालुक्यात नवीन बाजार समिती स्थापन होणार आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार यांनी एक तालुका- एक बाजार समिती योजना ची घोषणा केली होती. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने राज्य सरकारने आता प्रत्येक तालुक्यासाठी बाजार समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केला.
नव्याने उभारण्यात येणारे समित्यापैकी सांगलीत तीन, तर ठाणे, पुणे, नागपूर, गोंदिया, नांदेड, बीड, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यात एक तसेच भंडारा, चंद्रपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथील तालुक्यामध्ये प्रत्येकी दोन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाच एकर जागेवर तर उर्वरीत जिल्ह्यातील बाजार समित्या दहा ते पंधरा एकर जागेवर उभारल्या जाणार आहेत. त्याबाबत सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंध व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून महसूल विभागाला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. पणन संचालक हे बाजार समितीसाठी पायाभूत व तांत्रिक सुविधा बाबत स्थानिक गरजा विचारात घेऊन निकष निश्चित करणार आहेत.बाजार समितीमध्ये अडते व व्यापारांचे परवाने देण्यासंदर्भात सक्षम अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत