कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सर्वसामान्यांसाठी आणि खेडोपाडी वाहतुकीचे जाळे असणारी एसटी बससेवा आणखी महाग होण्याची शक्यता आहे. आता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या प्रत्येक तिकिटावर स्वछता कर आकारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यावर लवकरच निर्णय होईल. परिवहन विभागाकडून महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे प्रवाशांना आणखी झळ बसणार आहे.
वास्तविक राज्यभर एसटीच्या तिकीट दरात आधीच वाढ झाली आहे. २५ जानेवारीपासून महामंडळाने सर्व प्रकारच्या सेवांमध्ये सरासरी १४.९५ टक्के भाडेवाढ लागू केली होती. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे . मात्र जनतेच्या तीव्र विरोधानंतरही ही दरवाढ मागे घेण्यात आली नाही. आता पुन्हा स्वच्छता कर लावल्यावर प्रवाशांच्या खिशावर भार पडणार आहे. राज्यभरात दररोज लाखो प्रवासी एसटीचा वापर करत असल्याने, त्यांच्यावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाडेवाढीमुळे एसटी प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. या घटलेल्या प्रवाशामुळे महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. परिणामी, महसूल वाढवण्यासाठी एसटी प्रशासन विविध उपाययोजना करत असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता कर’ प्रस्तावित केला गेला आहे. सध्या हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विचाराधीन असून, तो मंजूर झाल्यास एसटी प्रवास अधिक महाग होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना प्रवास दरात अनेक सवलती देते. याचा ताण एसटीवर पडतो. परिवहन आपले खर्चाचा ताण कमी करण्यासाठी प्रवाशांच्या तिकीट दारात वाढ करते. सध्या पुणे, मुंबई, नाशिक याचबरोबर अन्य लांब पल्ल्याच्या प्रवासाचे एसटीच्या साध्या बसचे भाडेही खाजगी आरामदायी बसपेक्षा अधिक आहे. यामुळे प्रवाशी खाजगी बसला अधिक पसंती देतात. यामुळे एसटी बसला प्रवाशी कमी पडतात. याचा परिणाम म्हणून एसटीच्या काही फेऱ्या तोट्यात होतात.