प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
बल्गेरियातील प्रसिद्ध अंध भविष्यवक्ता बाबा वेंगाच्या कथित भविष्यवाण्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. २०२५ मध्ये सोनं आणि चांदीने नवीन विक्रम प्रस्थापित केले असून, सोन्याने सुमारे ८०% तर चांदीने १७०% पेक्षा अधिक परतावा दिला आहे. आता सर्वांच्या नजरा २०२६ कडे लागल्या असून, सोने-चांदीच्या किमतींच्या भविष्यातील प्रवाहाबाबत उत्सुकता वाढली आहे.
बाबा वेंगाच्या कथित भाकितानुसार, २०२६ हे बदलांचे वर्ष ठरणार आहे. जुन्या जागतिक शक्ती संपुष्टात येतील आणि नवीन शक्तींचा उदय होईल. या भाकितानुसार, जगाच्या सत्तेचे केंद्र आशियाकडे सरकेल आणि चीन जगातील सर्वात मोठी लष्करी व आर्थिक शक्ती म्हणून उभा राहील.
जागतिक संघर्षाची शक्यता देखील त्यांनी नमूद केली आहे. तैवान, दक्षिण चीन सागर आणि भारत-चीन सीमेवर भू-राजकीय तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवीन युती आणि प्रादेशिक विस्तारवादामुळे जागतिक व्यवस्था बदलू शकते, आणि संभाव्य तिसऱ्या महायुद्धामुळे आंतरराष्ट्रीय तणाव आणि राजकीय अशांती वाढू शकते, असे या भाकितांत नमूद आहे.
सोने-चांदीच्या किमतींवर या घटनांचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं आणि चांदी लोकप्रिय ठरतात, ज्यामुळे त्यांच्या किमतींना चालना मिळते. जर बाबा वेंगाची भाकितं खरी ठरली, तर २०२६ मध्ये सोन्याचे दर विक्रमी उच्चांक गाठू शकतात, असा दावा या कथित भविष्यवाणीत आहे.
युरोपातील राजकीय अस्थिरता, तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, हवामानातील टोकाच्या घटनांमध्ये वाढ आणि आरोग्य क्षेत्रातील आव्हाने देखील २०२६ मध्ये महत्त्वाचे ठरू शकतात, असे या भाकितांमध्ये नमूद आहे.
दरम्यान, अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे की बाबा वेंगा यांनी स्वतः सोन्या-चांदीच्या किमतींबाबत किंवा इतर घटनांबाबत लिखित स्वरूपात कोणतीही भविष्यवाणी नोंदवलेली नाही. उपलब्ध सर्व भाकिते त्यांच्या अनुयायांनी आणि माध्यमांनी मांडलेली आहेत. त्यामुळे या भाकितांकडे अंधश्रद्धेने न पाहता तटस्थ आणि तार्किक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.






