प्रसारमाध्यम : दिग्विजय माळकर
कोल्हापूर : प्रवासी व मालवाहतूक वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) मोठा बदल करत आहे. एप्रिल २०२६ पासून वाहनांची फिटनेस तपासणी पूर्णपणे स्वयंचलित यंत्रांद्वारे (Automatic Testing Center – ATC) केली जाणार आहे. या निर्णयामुळे वाहन तपासणी प्रक्रियेत होणारा विलंब, मानवी हस्तक्षेप तसेच चिरीमिरीसारख्या तक्रारींना आळा बसणार आहे.
कोल्हापूरमध्ये उभारले जाणार अत्याधुनिक एटीसी
खडीचा गणपती मंदिर ते कंदलगाव रस्त्यालगत असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या फिटनेस ट्रॅकच्या जागेत अद्ययावत ऑटोमेटिक टेस्ट फिटनेस ट्रॅक उभारण्यात येणार आहे. सध्या मोरेवाडी येथे असलेला वाहन तपासणी ट्रॅक येथेच एटीसीमध्ये रूपांतरित केला जात आहे.
राज्यात ४५ ठिकाणी एटीसी
राज्यभरात ४५ स्वयंचलित फिटनेस चाचणी केंद्रे उभारण्याचे काम सुरू असून कोल्हापूर हे त्यापैकी एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. यामुळे जुन्या पद्धतीने होणाऱ्या मॅन्युअल तपासणीऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
अशी होणार वाहन तपासणी
वाहनांच्या वर्गवारीनुसार वेगवेगळे ट्रॅक असतील.
-
वाहनांचे लाईट्स स्वयंचलित पद्धतीने तपासले जातील, त्यामुळे समोरच्या वाहनचालकांना त्रास होणार नाही
-
ब्रेक, स्टेअरिंग, इंडिकेटर यांची चाचणी पूर्णपणे तांत्रिक पद्धतीने होईल
-
सर्व प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाविना पार पडेल
-
प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतील
मशीनद्वारे गुणांकन
वाहन मशीनवर नेल्यानंतर सुमारे २० चाचण्या स्वयंचलित यंत्रांद्वारे घेतल्या जातील. प्रत्येक तांत्रिक बाबीसाठी मशीनद्वारे गुण दिले जातील.
जर वाहनात दुरुस्ती आवश्यक असल्याचे आढळले, तर त्याच दिवशी दुरुस्ती करून पुन्हा चाचणी घेता येणार नाही. त्यासाठी पुन्हा नव्याने अपॉईंटमेंट घ्यावी लागेल.
दहा मिनिटांत प्रक्रिया पूर्ण
संपूर्ण फिटनेस तपासणी प्रक्रिया स्वयंचलित असल्याने वाहनांच्या प्रकारानुसार वेळेत थोडाफार फरक असला तरी सरासरी दहा मिनिटांत प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
सध्याची प्रक्रिया काय आहे?
सध्या वाहनांच्या ब्रेक टेस्टसाठी २५० मीटर लांबीच्या ट्रॅकचा वापर केला जातो. वाहन पासिंगसाठी सुमारे २६ वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात आणि त्या सर्व ऑनलाइन नोंदणीनंतर मॅन्युअल पद्धतीने केल्या जातात. ही संपूर्ण प्रक्रिया आता ऑटोमेटिक होणार आहे.
अधिकाऱ्यांचे मत :
“मोरेवाडी येथे स्वयंचलित फिटनेस चाचणी केंद्र उभारले जात आहे. नवीन वर्षात एप्रिल महिन्याच्या दरम्यान या केंद्राचे कामकाज सुरू होईल. त्यामुळे वाहन तपासणीसाठी वेगळ्या ट्रॅकची गरज भासणार नाही,”
— चंद्रकांत माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
स्वयंचलित फिटनेस चाचणी केंद्र सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना जलद, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा मिळणार असून आरटीओतील गैरप्रकारांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





