चित्र सौजन्य-ग्रीन पीस
ज्या सागरातील पाण्यातून पृथ्वीवर जीव सृष्टीचा
उगम झाला त्या सागराच्या तळाशी असलेल्या दुर्मिळ मूलद्रव्यांनी बनलेल्या खनिजांवर व धातूवर आता मानवाची नजर पडली आहे. आता सगळ समुद्राच पाणी ढवळून समुद्र तळाला ड्रिलिंग मशिन ने खड्डे पाडून, समुद्रात खाणी खोदून ‘ सी मायनिंग” ने ही धातू व खनिजे वर काढण्याचे भयंकर नियोजन अमेरिका करत आहे. आणि चीन आपल्याकडे असणा-या या खनिज संपत्तीच्या जोरावर अमेरिकेस टक्कर देऊ पहात आहे. कोणे एके पुराण काळी ‘समुद्र मंथन झाले होते व त्यात अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानव यांनी मेरु पर्वताची रवी करुन वासुकी नागाच्या दोरीने समुद्र घुसळला होता.बरे झाले अमृत मिळाले नाही नाही तर एखादा थेंब मानवाच्या वाट्याला येवुन एव्हाना पृथ्वी उजाड केली असती. .
ही खनिजे सागर तळातून काढण्यासाठी ‘सी मायनिंग’असे गोंडस नाव असणा-या या नवीन ट्रेंडने शास्त्रज्ञ व पर्यावरणवाद्यांची झोप उडवली आहे. आता अनेक सागरांच्या तळाचे कसलाही विचार न करता ड्रीलिंग ने चेकिंग होईल व जेथे ही खनिजे सापडतील तेथे सागरी जीवन, पर्यावरणाचा विध्वंस करत ही खनिजे ओरबाडून काढली जातील.
ही खनिजे आहेत सध्याच्या चालू काळात अन्न पाण्यापेक्षा मुल्यवान झालेल्या मोबाइल, संगणक, इलेक्ट्रीक वाहने, शस्त्रास्त्रे , स्वच्छ ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये वापरली जाणारी. सर्व जग यावर अवलंबुन आहे.
———————————-
तर अशा या दुर्मिळ खनिज व धातुंचे साठे आहेत मुख्यत्वे सध्या रशियन आक्रमणात धगधगत असलेल्या युक्रेन मधे व अमेरिकेचा व्यापार व इतर अनेक बाबतीत शत्रु क्र.1 असलेल्या चीन मधे. ( जगाच्या उत्पादनाच्या 90%) पॅसिफिक महासागराच्या तळाशी असणा-या, ‘साउथ चायना सी’ मधे असणा-या या खनिजांनी अमेरिका व चीन यातील व्यापारी युद्ध चीनच्या बाजूने झुकवले आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर अमेरिका व चीन आणि अमेरिका व एकंदरीत सर्व जगच यातील व्यापारी युदधास विलक्षण धार चढली आहे. मध्यंतरी अमेरिकेने राशिया व युक्रेन यातील मध्यस्थी करण्याचा असफल प्रयत्न केला होता. तो सर्वाना आठवतच असेल. त्यावेळीही अमेरिकेने या मध्यस्थीच्या बदल्यात युक्रेन ने आपल्याकडील खनिजांचे साठे आपल्या हवाली करावेत अशी अट घातली होती. याचे खरे कारण म्हणजे जगातील सुमारे ९०% शुद्ध दुर्मिळ मूलद्रव्यांच्या खनिजांचे उत्पादन चीन करतो व अमेरिका ते आयात करते.
गेल्या आठवड्यात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी चीन वर लादलेल्या आयात शूल्काला प्रतिसाद म्हणून चीननेही अशा दुर्मिळ मुलद्रव्य खनिज घटकांच्या अमेरिकेस होणा-या निर्यातीवर निर्बंध लादले, ज्यामुळे स्मार्टफोनपासून ते इलेक्ट्रिक कार बॅटरीपर्यंत सर्व महत्त्वाच्या खनिजांचा अमेरिकेस तुटवडा भासु शकतो.
‘अमेरिका फर्स्ट’असे धोरण असलेले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यानी ताबडतोब यावर उपाय योजना सुरु केल्या आहेत.याचाच एक भाग म्हणून ट्रम्प प्रशासन पॅसिफिक समुद्राच्या तळातून ‘सी मायनिंग’ द्वारे पर्यावरण व समुद्रातील जीवसृष्टीला काडीची किंमत न देता खनिजे व धातू ख़णून त्यांची साठवणुक करण्यासाठी अधिकृत कार्यकारी आदेश तयार करत आहे असे परदेशी माध्यमांनी वृत्त दिले आहे.
या योजनेअंतर्गत चीनशी भविष्यात संघर्ष झाल्यास धातू आणि दुर्मिळ खनिजे यांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून अशा दुर्मिळ धातू व खनिजांचा साठा करुन भविष्यात वापरण्यासाठी अमेरिका ‘तयार’ असेल, असे अहवालात म्हटले आहे.
त्यासाठी खोल समुद्रात खाणकाम करुन समुद्राच्या तळाशी असणा-या या खनिजांचे उत्पादन जलद गतीने करणे आवश्यक आहे असे अहवालात म्हटले आहे.
संरक्षण उत्पादन कायद्याअंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून, (थोडक्यात इतर सर्व धुडकावून) समुद्राच्या तळाशी असलेल्या निकेल, मॅंगनीज आणि कोबाल्ट यानि समृद्ध असलेले पॉलिमेटॅलिक समुद्री नोड्यूल उत्खननाने मिळवून अमेरिकेचे चीन वरील अवलंबित्व कमी करण्याचा हा उपक्रम आहे !.
ही खनिजे प्रगत तंत्रज्ञान, संरक्षण प्रणाली आणि अक्षय ऊर्जा यांच्या पायाभूत सुविधांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. बॅटरी उत्पादन, एरोस्पेस अभियांत्रिकी आणि लष्करी हार्डवेअरसाठी आवश्यक असलेली खनिजे. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये कोबाल्ट हा एक महत्त्वाचा घटक आहे, तर निकेल ऊर्जा घनता आणि दीर्घायुष्य वाढवते.
या खनिज व धातुंचे असे उपयोग असले तरी यासाठी समुद्राचा तळ मशिनने खणला जाणार आहे. सागरी जीव, मासे, समुद्रातील वनस्पती, खोल समुद्रातील तळाशी असणारी जीव सृष्टी त्यामुळे नष्ट होणार आहे. या नाजूक इकोसिस्टीम ला त्यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. अमेरिका व चीन यातील व्यापार युद्ध हे आता अशा गंभीर ट्प्प्या वर पोहोचले आहे.
खोल समुद्रातील खाणकामामुळे पर्यावरणीय धोके निर्माण होतात, ज्यामध्ये खोलवरच्या प्रजातींचा अधिवास नष्ट होणे आणि सागरी जीवनाचा नाश होऊ शकणारे गाळाचे ढिगारे यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरणाने (ISA) व्यावसायिक उत्खननासाठी अद्याप नियम अंतिम केलेले नाहीत, ज्यामुळे पर्यावरणीय प्रोटोकॉल अनिश्चित राहिले आहेत. २०० हून अधिक सागरी शास्त्रज्ञांनी समुद्रतळातील खाणकामाचे परिणाम पूर्णपणे समजेपर्यंत त्यावर स्थगिती देण्याची मागणी केली आहे, कारण त्यांनी समुद्राच्या तळातील जैवविविधतेला आणि कार्बन नियंत्रण प्रक्रियेला धोका असल्याचे कारण दिले आहे. केवळ व्यापार व आर्थिक विकास म्हणजेच मानवाचा विकास हेच लक्ष्य मानणार्या या देशाना आता हे कोण समजावून सांगणार.

मानवाने तो वास्तव्य करत असलेल्या पृथ्वीचे सदा शोषणच केले आहे. जंगलांचा -हास केला, पर्वत, डोंगर बोडके केले. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक सम्पत्तीची लूट केली. प्राण्यांची कत्तल करुन, अमर्याद शिकार करून अनेक प्रजातीं नामशेष केल्या. पृथ्वीच्या पोटातून खनिजे काढली, खाणकाम केले, पृथ्वी अक्षरश: कोरून काढली. उद्योगधंद्याच्या नावाखाली पाणी साठे प्रदुषित केले. त्यातील जीव सृष्टीचा संहार केला. हवेत विषारी धूर सोडून हवा, पक्षी सृष्टी, वने यांचा विनाश केला.
अमर्याद व अनियंत्रीत संसाधनांची अशी लूट कोणताही विचार न करता झाल्याने पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणा-या ग्रेटा थेनबर्ग सारख्या तरूण मुलीनी सर्व राजकारणी व सत्तेवर असलेल्या सरकाराना धारेवर धरले. माणसाच्या या ‘अॅक्टिव्हिटीज’मुळे प्रुथ्वीवरिल ओझोन वायुचे आवरण कमी होउन पृथ्वीचे तपमान वाढू लागले आहे. अशा मानवाच्या करामतीमागे आहे तो मानवाचा हव्यास व राष्टाराष्ट्रातील हिणकस स्पर्धा. सर्व पृथ्वी अगदी अंतराळही यापासून आता अलिप्त राहिलेले नाही.
,