Google search engine

प्रसारमाध्यम प्रतिनिधी  :
कोल्हापूर जिल्ह्यात आयटी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा पार पडला असून बहुप्रतिक्षित आयटीपार्क उभारणीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून स्थानिक युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

कोल्हापूर शहर आयटी क्षेत्रासाठी सर्व बाबींनी पूरक असतानाही आजपर्यंत योग्य जागेच्या अभावामुळे आयटी उद्योगांना अपेक्षित गती मिळू शकली नव्हती. परिणामी अनेक तरुणांना रोजगारासाठी पुणे, बंगळुरू, हैदराबादसारख्या महानगरांकडे स्थलांतर करावे लागत होते. मात्र आता शेंडा पार्क येथील आरोग्य व कृषी विभागाच्या जागा आयटीपार्कसह विविध शासकीय प्रयोजनांसाठी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिल्याने ही दीर्घकाळची अडचण दूर होणार आहे.

या निर्णयाबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. शेंडा पार्क येथील जागा आयटीपार्कसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

स्थानिक युवक-युवतींना थेट लाभ

आयटीपार्क उभारणीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींसाठी हजारोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती होणार आहे. आयटी, आयटी-आधारित सेवा, स्टार्टअप्स, तसेच सहाय्यक उद्योगांना चालना मिळून शहराच्या आणि जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आयटीपार्कच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाचे नवे सुवर्णद्वार खुले होणार असल्याचा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

विधानसभेत मुद्दा उपस्थित

कोल्हापूर आयटी क्षेत्रासाठी पूरक असूनही केवळ जागेअभावी मागे पडत असल्याचा मुद्दा आमदार राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभेत मांडला होता. पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे त्यांनी हा विषय सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी संबंधित बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर झालेल्या पाठपुराव्याला यश येत शासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

2047 च्या दृष्टीकोनाशी सुसंगत निर्णय

पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 2047 पर्यंत जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न मांडले आहे. या दृष्टीने केंद्र शासनाने नीती आयोगाची, तर राज्य शासनाने ‘मित्र’ संस्थेची स्थापना केली आहे. मित्र संस्थेच्या माध्यमातून कोल्हापुरात शाश्वत विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत फौंड्री, वस्त्रोद्योग, कृषी, आयटी आणि पर्यटन या पाच प्रमुख क्षेत्रांच्या विकासावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मित्र संस्थेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी धोरणात्मक विकास योजना आखण्यात आल्या असून, ‘महा स्ट्राइड’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यांची विकासक्षमता ओळखून स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवला जात आहे. याच अनुषंगाने कोल्हापुरात आयटी क्षेत्राशी संलग्न डेटा सेंटर उभारण्याचे नियोजनही शासनाच्या विचाराधीन आहे. डेटा सेंटरसह आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्यास कोल्हापुरात आयटी क्षेत्राचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

आयटीपार्क उभारणीस मिळालेल्या शासनमान्यतेमुळे कोल्हापूर आता औद्योगिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नवे केंद्र म्हणून उदयास येण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here