ओढ्यावरची आंबील यात्रा म्हणजे कोल्हापूरकरांसाठी आनंदाची पर्वणीच. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली की अगदी बाहेरगावी असलेल्या माहेरवाशिणीदेखील आंबील यात्रेच्या तारखेची आतुरतेने चौकशी करतात. ही तारीख मार्गशीर्ष पौर्णिमेला, देवीच्या कंकण विमोचन सोहळ्याच्या दिवशी परंपरेनुसार जाहीर केली जाते.
रांडव पौर्णिमेच्या दिवशी पालखी प्रदक्षिणा पूर्ण करून सदरेवर विसावल्यानंतर मंदिरातील फळ्यावर स्वयंसेवकांकडून आंबील यात्रेची तारीख जाहीर होते. या घोषणेसोबतच दुःखमग्न, चेहरा झाकलेल्या जगदंबेच्या दर्शनाने आलेले दुःखाचे सावट काहीसे हलके होते, अशी भाविकांची भावना असते.
चंपाषष्ठीला सौंदत्ती डोंगरावर गेलेली ओढ्यावरील मानाची जग—मदन आई शांताबाई जाधव (माई), रविवार पेठेतील बायाक्काबाई चव्हाण, गंगावेशमधील लक्ष्मीबाई जाधव आणि बेलबागेतील बायाक्काबाई चव्हाण यांची आळवेकर शाखा—सौंदत्तीहून निघून शहराच्या हद्दीवर येऊन थांबतात. त्र्यंबुलीची जत्रा करून शहरात प्रवेशाची परवानगी घेतल्यानंतर यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी ही जग सासनकाठीसह जवाहर नगर चौकात पोहोचतात.
चौकात आरतीनंतर हलगी-घुमक्यांच्या निनादात देवीला पाच प्रदक्षिणा घालून जग मंदिराच्या पाठीमागील मांडवात विराजमान होतात. जुनी परंपरा सांगते, ‘देव केवडीत विसावले की यात्रा खऱ्या अर्थाने सुरू होते.’
पूर्वी यात्रेच्या दिवसाची वाट पाहिली जात असे; मात्र आता जग बसल्यापासूनच देवीला भाकरी, वडी, वरण, वांग्याची-मेथीची भाजी, दहीभात, कांदा-लिंबू आणि आंबील (बेसन किंवा ज्वारीच्या पिठाची ताकाची कढी) असा नैवेद्य अर्पण केला जातो. सौंदत्तीला जाऊन वैधव्य हरवून आलेल्या रेणुकेचे सांत्वन म्हणून ही परंपरा मानली जाते.
यात्रेच्या दिवशी देवी सकाळी सालंकृत, सौभाग्यसंपन्न रूपात दर्शन देते. दुपारी चारच्या सुमारास आरती होऊन पालखीतून मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. संध्याकाळ होताच नवसांची पूर्तता झाल्यानंतर हौशी-गवशींची जत्रा रंगते. भाविक देवीला नैवेद्य अर्पण करून मंदिर परिसरातच आंबील-भाकरीच्या जेवणाचा आस्वाद घेतात—सांत्वनाच्या प्रसंगी यजमानासोबत भोजन करण्याची जुनी कोल्हापुरी परंपरा यानिमित्ताने जपली जाते.
आकाश पाळणे, विविध खेळणी, विद्युत रोषणाई, खाऊच्या गाड्या, विक्रेत्यांच्या आरोळ्या आणि तरुणाईचे पिपाण्यांचे नाद—या साऱ्यांनी परिसर गजबजून जातो. रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास मानाच्या जगांची आरती होते. ओट्या स्वीकारून जग सासनकाठ्यांसह आपल्या ठिकाणी मार्गस्थ होतात.
जत्रा जिथल्या तिथे असतानाही, जग देवळातून बाहेर पडून म्हसोबाच्या दिशेने निघताच उत्सवाचा नूर ओसरू लागतो. शेवटी बेलबागच्या जगासह सर्व जग बाहेर पडल्यानंतर अनामिक हुरहुर लावून आंबील यात्रा संपन्न होते. दुसऱ्या दिवसापासून जगदंबा आपल्या मूळ आनंदरूपात दर्शन देत भक्तांना सौख्याचा आशीर्वाद देते.
उदे ग आई उदे आई यल्लम्मा !






