समाजमाध्यमातून सुरु झालेला कोणताही उपक्रम अल्पजीवी ठरतो, असा सर्वसाधारण अनुभव. कोल्हापूरचे निवृत्त बँक अधिकारी श्री. कृष्णा दिवटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र याला अपवाद ठरेल, असे भरीव कार्य केले आहे.
एकंदरीतच वाचन कमी होत आहे, नवीन पिढी काही वाचत नाही, असा सर्वसाधारण समज. या समजालाही छेद देणारा उपक्रम म्हणजे पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान.
2020 मध्ये जेव्हा कोरोनामुळे टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर झाली, तेव्हा एका बाजूला सर्वत्र दाटलेली भीती, अनिश्चितता आणि दुसरीकडे भरपूर मोकळा वेळ अशा विचित्र परिस्थितीत सगळेच सापडले होते.
काही लोकांनी समाजमाध्यमावर वेगवेगळे मनोरंजनात्मक आणि कौटुंबिक उपक्रम केले, तर काही ठिकाणी याचा दुरुपयोगही होऊ लागला. याच वेळी फेसबुकवर एका पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि त्या पुस्तकाबद्दलची थोडक्यात माहिती द्यायची अशी अभिनव कल्पना श्री. कृष्णा दिवटे आणि त्यांच्या अनंत मिसे, प्रसाद नातू, अजिंक्य लाटकर , राजा बर्वे यासारख्या सहकाऱ्यांनी सुरु केली. प्रत्येक आठवड्याला नवा पुस्तक परिचयकर्ता शोधावा लागत असे. हा शोध सुटसुटीत करण्यासाठी वाचकमित्रांना एकत्र घेऊन त्यांनी एक व्हाट्सअप समूह तयार केला आणि एका अभिनव उपक्रमाचे रोपटे लावले गेले. आज या रोप्ट्याचा वटवृक्ष झालेला आहे.
सोमवार ते रविवार एका परिचयकर्त्याने पुस्तक परिचय व्हाट्सअप समूहावर सादर करायचा, त्या अनुषंगाने दुपारी 4 पर्यंत केवळ त्या पुस्तकाविषयी, लेखकाविषयी चर्चा असे या उपक्रमाचे स्वरुप. दुपारी चारनंतर कला, साहित्य, संगीत व अशाच इतर सांस्कृतिक विषयांवर खुले व्यासपीठ उपलब्ध असते. इथे वाढदिवसाच्या तसेच सण समारंभाच्या शुभेच्छा अजिबात दिल्या जात नाहीत, हेही एक विशेष. पाच वर्षांहून अधिक काळ चालू असलेल्या या अभियानात आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी 2000 वा पुस्तक परिचय सादर होत आहे. या आठवड्याच्या परिचयकर्त्या सौ. प्रज्ञा पावगी (ठाणे ) यांच्याकडून हा परिचय सादर होत आहे.
व्हाट्सअप वर साडे सहाशे आणि फेसबुकवर सुमारे सहासष्ठ हजार सभासद असलेल्या पुस्तकप्रेमी समूहात लेखक, प्रकाशक यांच्याबरोबरच बँकर, शिक्षक, डॉक्टर, उद्योजक, व्यावसायिक यांचाही सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्राबरोबरच अनेक राज्यात तसेच परदेशात स्थायिक झालेल्या मराठी माणसांच्या देशातही पुस्तकप्रेमी समूहाचे सभासद आहेत. वाचन संस्कृती जोपसण्याचे आणि वृद्धिंगत करण्याचे मोलाचे काम पुस्तकप्रेमी समूह अव्याहतपणे करत आहे.
लेखक आपल्या घरी या ऑनलाईन उपक्रमाद्वारे लेखकांच्या मुलाखती, प्रत्येक शनिवारी थीम बेस्ड काव्यसंध्या, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी साहित्यिक, सांस्कृतिक, कलाविषयक ऑनलाईन चर्चा सत्र, कथा जागर उपक्रमातून कथा लेखनाला प्रोत्साहन, दरवर्षी दोन दिवसाची स्नेहसंमेलने, स्नेहसंमेलनात सदस्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन यासारखे उपक्रम करून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे कार्य समूह करतो. याचबरोबर चिपळूण, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासारखे सामाजिक जाणीव असलेले उपक्रम समूह करीत आला आहे.
वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी पुस्तकप्रेमी करीत असलेल्या चळवळीचे संचलन कृष्णा दिवटे, सचिन केळकर, श्रेया राजवाडे, केदार मारुलकर , अविनाश गडवे, अजिंक्य लाटकर अशी गावोगावची वाचनप्रेमी मंडळी करीत आहेत.
साडे पाच वर्षात एकही दिवसाचा खंड न पडता सलग 2000 पुस्तकांचे परिचय करून देणाऱ्या पुस्तकप्रेमी चळवळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.






