प्रसारमाध्यम डेस्क :
या भागात आपण पाहू तुळजापूर ची लग्न,खाद्य परंपरा आणि त्यांचा भवानी देवी आणि तिने वध केलेल्या दैत्यांशी असलेला संबध.
कोल्हापुरच मटण म्हणजे चरचरीत तिखट असा एक सर्वसाधारण समज आहे, अशा लोकांनी आमच्या भागातले (तुळजापूर भागातील)चिकन-मटण खावे म्हणजे त्यांना तिखट व झणझणीत शब्दाचा अर्थ थेट डोक्यात भिनेल. एक भुरका मारला तरी डोक्यावर, तोंडावर रुमाल फिरवावा लागतो. त्यातही तुळजापूरचे मटण अस्सल तिखटजाळ.
तिथे तर देवीसाठी जो नवैद्य भोपी करतात त्यात देवीसाठी पुरणपोळी, दूध आणि तिने वध केलेल्या महिषासुरासाठी मटण व दारूचा नवेद्य थेट देवीपर्यंत नेण्याची व दाखविण्याची प्रथा आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी ही पद्धत नसावी असे मानले जाते. कारण तसे संदर्भ सापडत नाहीत. ज्या महिषासुराचा वध देवीने केला म्हणून तिचे नाव महिषासुरमर्दनिी आहे, त्या दैत्यालाही नवेद्य दाखवला जातो, हे अजबच म्हणायला हवे.
तुळजापूरचे देवीची पूजा आणि दैत्याचीही पूजा हे जसे अजब रसायन आहे तसेच इथले रीतिरिवाज, सण, सामाजिक चालीरीती यासोबतच इथल्या विशेषत: मराठा समाजातील खास जेवणावळी यादेखील तितक्याच प्रसिद्ध, पण सर्वसाधारणपणे स्थानिक लोकांच्या व्यतिरिक्त इतरांना फारशा माहीत नसलेल्या आहेत; हे त्याचे वैशिष्टय़च म्हणायला हवे. या जेवणावळीत खास जेवणावळी या लग्नाशी निगडितही आहेत. स्थानिक पाहुण्यारावळ्यात एखाद्याच्या घरात लग्न ठरले ही बातमीच सगळ्यांना पर्वणी असते. त्यामुळे लग्न ठरले की पहिली जेवणावळ ही लग्न ठरल्याची म्हणजे नमनाची. ही साधी शाकाहारी असते. पण त्यानंतर दुसरे जेवण मात्र सामिष असते. तुळजापुरात लग्न, मग ते कोणत्याही जातीचे, गरिबाचे वा मानकराचे असेल, ते लग्न मंदिरातच लावायची पद्धत होती. ही प्रथा जवळपास १९८० पर्यंत होती. आणि लग्न म्हटले की देवकार्य आलेच. देवकार्याचा अर्थच असा की, देवासाठी दिलेले जेवण.देवकार्य सामिष असलेच पाहिजे, मग ते लग्नाच्या आधी किंवा नंतर, जसे सोईचे असेल तसे दिले तरी चालते.
त्यानंतर पाहुण्यारावळ्यांची केळवण सुरू होतात, तीच मांसाहाराची. शिवाय त्यात प्रारंभी दारू नसेल तर त्या जेवणाला काय अर्थ आहे? या जेवणात सुक्के आणि रश्श्याचे, खिमा, बिर्याणी असा सगळा साग्रसंगीत बेत असतो. ही जेवणे फक्त नातेवाईक व संबंधितांचीच असतात, त्यामुळे त्याला मर्यादित व ठराविक लोकांनाच आमंत्रण असते. इथे लग्नाच्या जेवणाला जेवढे महत्त्व नसेल तितके या ‘गडंगणाच्या’ (केळवणाच्या) जेवणाला असते, हे विशेष! अशी केळवणं काही लोकाच्याकडे तर एका दिवसाकाठी दहा-बारासुद्धा असू शकतात. त्यामुळे गेलं तरी पंचाईत, नाही म्हटलं तर ‘पावणे’ नाराज होण्याची भीती व त्यांना तो अपमान वाटेल, ही धास्ती. त्यामुळे तुळजापूरकर अशा सगळ्या ठिकाणी आवर्जून जातात व रीतीनुसार ‘हात ओले’ करतात.
यानंतरच्या जेवणावळी या लग्नाआधी होणाऱ्या देवकार्याच्या. या जेवणाची पहिली पंगत संध्याकाळी साधारणपणे सहा वा. सुरू होते व शेवटची रात्री बारा-एक वाजेपर्यंत. यात पहिली पंगत गप्पागोष्टी ऐकण्याची तर शेवटची फक्त ‘पाहण्यासारखी’ असते असे म्हणतात. सुरुवातीला लहान मुले व सामान्य जनतेच्या पंगती असतात. त्यांना मटणाचा एखादा-दुसरा तुकडा व भरपूर झणझणीत रस्सा असला तरी भागते, त्यांचे पोट भरते. जितका उशिरा येईल तितका तो पाहुणा मानाचा असतो. जसा उशीर होईल तितकीच येणाऱ्यांची पिण्याची वाढती कॅपॅसिटी लक्षात येत असते. बऱ्यापकी पिणारे या मधल्या काळात जेवण करून जातात. त्यांना मटणासोबत तिखट रस्सा व त्यावर ‘र्ती’ म्हणजे तिखटाचे तेल असले की भागते. शेवटची पंगत ही खाशा स्वाऱ्यांची. या पंगतीला येणारे पाहुणे नुसते डुलतच नव्हे, तर दोन माणसांच्या आधारानेच त्यांचे आगमन होते. या पंगतीतली मंडळी जेवणासाठी आलेलीच नसतात, कारण त्या अवस्थेत ते नसतातच. त्यामुळे ‘जास्त झालेल्या’ या मंडळींचे नुसते बोलणे ऐकणेही आपली करमणूक करणारे असल्याने, ही केवळ ‘ऐकण्याची’ पंगतच म्हणायला हवी. या जेवणावळीच्या पंगतीशिवाय पक्षपंधरवडय़ात होणाऱ्या पंगती वेगळ्याच कारणांनी गाजतात. हे पंधरा दिवस त्यात केल्या जाणाऱ्या पदार्थाच्या चच्रेतच जात असले तरी भजी आणि कढी हे त्या शाकाहारी जेवणातले अत्यावश्यक पदार्थ हे करावेच लागतात. दुपारी बारानंतर सुरू होणाऱ्या या जेवणावळी रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत चालतात.
पुढील भागात ‘आराध’ बसण्याची पद्धत म्हणजे काय हे पाहू.





