Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क :

भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय पासपोर्ट आता कात टाकत आहे. भारताने आता नव्या जमान्याचा ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे, ज्यात अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. परदेशात प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी ही सुविधा जून २०२५ पर्यंत पूर्णपणे लागू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

नवीन  ई-पासपोर्टमध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य या मध्ये एक हाय-टेक RFID चिप बसवलेली आहे. या चिप मुळे प्रवाशाचे एन्क्रिप्टेड बायोमेट्रिक्स डेटा आणि इतर वैयक्तिक माहिती सुरक्षितपणे साठवून ठेवायला मदत होईल. त्याच्या कॉन्टॅक्टलेस डेटा रीडिंग क्षमतेमुळे, इमिग्रेशन काउंटरवर व्हेरिफिकेशनसाठी लागणारा वेळ खूपच कमी होणार आहे.ऑटोमेटेड ई-गेट्सवर फायदा अनुभवता येईल.

ई-पासपोर्ट सेवा ही केवळ चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर, सूरत, नागपूर, गोवा, जम्मू, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, रांची आणि दिल्ली येथील पासपोर्ट सेवा केंद्रावर उपलब्ध होती. पण आता देशभरात सुरू झाली आहे. अर्थात सर्वच केंद्रावर ही सेवा अजून सुरु झाली नाही. काही केंद्रावर ती लवकरच पोहचणार आहे. नागरिकांना ई-पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे.

सर्वात सुरक्षित नवीन ई-पासपोर्ट
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवा ई-पासपोर्ट फ्रॉड आणि बनावटगिरी रोखण्यास मदत करेल. एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पासपोर्ट असण्याच्या घटनांनाही या नवीन प्रणालीमुळे आळा बसेल. याशिवाय, पासपोर्टच्या छपाईतही ‘इंटर-लॉकिंग मायक्रो-लेटर्स’ आणि ‘रिलीफ टिंट्स’ सारखे सुरक्षा तंत्रज्ञान वापरले गेले आहे.

नागरिकांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी नवीन प्रणालीत AI चॅटबॉट आणि व्हॉईस बॉट ॲप्लिकेशन्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ही प्रणाली आधार, पॅन आणि डिजीलॉकरशी देखील जोडली जाईल. परदेश प्रवासाची तयारी करणाऱ्या आणि जलद, सुरक्षित प्रवासाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे.यामध्ये पासपोर्ट धारकाची संपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीनं जतन करण्यात येईल. बोटांची ठसे आणि डिजिटल फोटो सुरक्षित राहतील. यामुळे पासपोर्टची बोगस कॉपी तयार करणे कठीण होईल. या कव्हरवरील Passport शब्दाच्या खाली सोनेरी रंगाचे एक चिन्ह असेल. त्यामुळे ई-पासपोर्ट लागलीच ओळखता येईल. हा पासपोर्ट जागतिक ICAO मानांकनानुसार तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात त्याला मान्यता असेल.

जुने नॉन-इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट त्यांच्या मुदतीपर्यंत वैध राहतील.

 

असा करा अर्ज :

  • पासपोर्ट सेवा पोर्टलवर जाऊन नोंदणी/लॉगिन करा.
  • ऑनलाईन अर्ज भरून जवळचे पासपोर्ट सेवा केंद्र निवडा.
  • निश्चित शुल्क ऑनलाईन जमा करा आणि अपॉईंटमेंट बुक करा.
  • निश्चित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह या केंद्रावर पोहचा.
  • येथे व्हेरिफिकेशन आणि बायोमॅट्रिक कॅप्चर नंतर ई-पासपोर्ट देण्यात येईल.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here