प्रसारमाध्यम डेस्क:
बकऱ्याची झडती
नवरात्रात अजाबळी म्हणून जे बकरे कापले जाते ते बकरे देण्याचा मान सिंदफळच्या एका गृहस्थाचा असतो. वर्षभर त्यांनी सांभाळलेले बकरे अजाबळीच्या दिवशी वाजतगाजत मंदिरात आणले जाते व रीतसर पूजेनंतर ते कापले जाते. केवळ अजाबळीच्याच बकऱ्याचे हे विशेष नाही, कोणताही बळीचा बकरा कापण्यासाठी एक विशिष्ट पद्धत इथे अवलंबली जाते.
त्यानुसार इतर वेळीदेखील बकऱ्याचा जो नवेद्य असतो ते बकरे कापण्यापूर्वी त्याची ‘झडती देणे’ महत्त्वाचे आहे. बळी दिल्या जाणाऱ्या बकऱ्याची परवानगी मागण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकले जाते. त्यानंतर त्या बकऱ्याने पूर्ण अंग जर झटकले तरच त्याने ‘झडती’ म्हणजे परवानगी दिली असे समजून ते कापले जाते. त्याने जर ही झडती दिली नाही तर लोक असे बकरे दुकानदाराकडे परत देऊन दुसरे बदलून आणतात व दुकानदारही ते बदलून देतात हे विशेष.
आश्चर्याची बाब अशी की श्रीतुळजाभवानीची मंदिरे नेपाळमधील काठमांडू आणि भाटगांव (सध्याचे भक्तपूर) इथेही आहेत. यासंबंधी ज्येष्ठ समीक्षक, संशोधक व साहित्यिक डॉ. रा. चि. ढेरे यांनी त्यांच्या श्रीतुळजाभवानी या अभ्यासग्रंथात उल्लेख केला आहे. मिथिलेचा राजा हरिसिंहदेव यांनी इ.स. १३२४ ते मध्ये उभारले. कर्नारवंशीय हरिसिंहाची कुलस्वामिनी तुळजाभवानी होती. तिच्या दृष्टांतानुसार तो नेपाळमध्ये गेला. देवीचे मंदिर प्रथम भाटगांव (भक्तपूर) इथे उभारले. नेपाळमधील कर्नारवंशीय राजघराण्याची सत्ता संपल्यावर मल्ल, गोरख या पुढच्या राजवंशीयांनीही श्रीतुळजाभवानीचा स्वीकार कुलस्वामिनी म्हणूनच केला. त्यानुसार भक्तपूर, काठमांडू आणि देवपारण येथील तिची ठाणी या राजकुलांच्या श्रद्धेचा विषय होती.
सोलापूरला जाता-येता तुळजापूर स्थानकावर बस थांबली की, तेथील भोपी म्हणजे पुजारी लोक हातात एक चोपडी घेऊन यात्रेकरूंना गाठत असत. सर्वसाधारणपणे आपल्या घराण्यातील कोणतीही व्यक्ती एकदा तुळजापूरला येऊन गेलेली असेल तर त्याची संपूर्ण माहिती म्हणजे वंशावळ या भोप्यांच्या चोपडीत लिहिलेली असे. ते सगळे एकमेकांशी संगनमत करून ज्याच्या चोपडीत त्या यात्रेकरूचे नाव असेल त्या भोप्याकडे वा पुजारी ब्राह्मण असल्यास त्याच्याकडे त्या यात्रेकरूला हवाली करत.
त्यानंतर ते यात्रेकरू त्या पुजाऱ्याकडे, त्यांच्या मोठमोठय़ा वाडय़ात राहणे, पूजा, अभिषेक, भोजन याच्या व्यवस्थेसाठी उतरत. त्यातही ज्यांची नावे कोणत्याच चोपडीत नसतील त्यांना ‘खंडून’ म्हणत. अशांचा लिलाव पुजाऱ्यात आपसात करून त्यात जादा बोली देणाऱ्याकडे त्या यात्रेकरूला स्वाधीन केले जाई व नंतर तो त्याचा कायम यात्रेकरू असे. या चोपडय़ा आधी मोडी भाषेत होत्या. काही जणांनी त्या नंतर मराठीत केल्या. आता तर त्यातही आधुनिकता आली. आता ही नावे कॉम्प्युटरवर फीड केली जातात. पूर्वी यात्रेकरू चारचार दिवस भोपी किंवा पुजाऱ्याकडे मुक्कामाला असत. आता मुक्काम कमी, शक्यतो नाहीच ही वेळ आली आहे. त्यामुळे दर्शन घेऊन जेवण करायचे व नारळ-प्रसाद घेऊन परत जाणे लोक जास्त पसंत करीत आहेत. गेल्या पाच-दहा वर्षांत तर फोनवर लॉजचे बुकिंग करून पूजा झाली की परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
पुढील भागात पाहू तुळजापूर, एक गाव, एक चव






