सोहळा ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आणि उत्साह यमाई देवीच्या आणि जमदग्नींच्या लग्नाचा.
चैत्र यात्रा म्हटलं की समस्त ज्योतिबा भक्तांच्या आनंदाला उधाण येतं. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सासनकाठी उभी केली की हळूहळू ज्योतिबा यात्रेचा रंग चढायला लागतो आज हा रंग वाडी रत्नागिरी वरती तर आहेच पण शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलवर देखील आलेला आहे. अशातच अनेक माहिती देणाऱ्या लेखांचे प्रसारण होत असते.
पूर्वी अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या संदर्भ अभ्यासण्यात झालेल्या चुकांमुळे तसेच प्रत्यक्ष निरीक्षणाच्या अभावामुळे एक प्रघात पडून गेलेला आहे आणि तो म्हणजे चैत्र यात्रेचा सोहळा हा यमाई आणि ज्योतिबा यांच्या विवाहाचा सोहळा आहे पण खरे तर हा सोहळा यमाई स्वरूपी रेणुका व जमदग्नी रुपी देवाची कट्यार यांचा असतो. वास्तविक केदार विजयाच्या 27व्या अध्याय याविषयीची शंका माता लोपामुद्रेने महर्षी अगस्ती यांना विचारली आहे ती म्हणते महर्षी आपण यापूर्वी वर्णन करताना नाथ केदार ब्रह्मचारी असल्याचे सांगितले आहे मग हे विवाह कर्म कसे तेव्हा तिला स्पष्टीकरण देताना महर्षी अगस्ती सांगतात हे भार्ये केदारलिंग हे त्रिगुणावतारी असून त्यांच्या हातातील शस्त्रामध्ये महर्षी जमदग्नींचा क्रोध विराजमान आहे. ज्यावेळेस नाथ यमाईला भेटायला आले तेव्हा पूर्वी माहूरगडावर सती जाते वेळेला झालेल्या संवादाची आठवण करून तिने पुन्हा एकदा महर्षी जमदग्नीच्या भेटीचे स्मरण केले तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नाथांनी स्वतःच्या शस्त्रातून जमदग्नींना वेगळे करून त्यांना रेणुकेची अर्थात यमाईची भेट घेण्याची विनंती केली हा सर्व प्रसंग द्वापार युगामध्ये घटल्याने तीन युगांचा विरह संपवण्यासाठी दोघांचे पुन्हा एकदा शास्त्रोक्त विवाह कर्म करण्यात आले यालाच अनुसरून आजही देवाचे शस्त्र अर्थात कट्यार यमाईच्या गाभाऱ्यात नेले जाते तिथे रीतसर अंतरपट धरून मंगल अक्षता टाकल्या जातात आणि यानंतर ज्योतिबाच्या श्रीपूजकांच्या स्त्रिया देवीला सौभाग्यवाण अर्पण करतात हा विधी लाखोंच्या गर्दीत होत असल्याने फार कमी लोकांना प्रत्यक्ष पाहता येतो आणि यात्रेमध्ये हर एक माणसाला स्पष्टीकरण देता येणे शक्य नसल्याने या विधीची कथा फार कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे हा विवाह सोहळा ज्योतिबाचाच होतो असा गैरसमज सर्व दूर पसरला आहे यातून रामचंद्र चिंतामण ढेरेंसारखे अभ्यासक सुद्धा सुटलेले नाहीत अर्थात त्यांच्या अभ्यासावरती प्रश्न उपस्थित करणार नसलो तरी त्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले आहे किंवा नाही याबद्दल नेमका संदर्भ मिळत नसल्याने त्यांनी लज्जा गौरी आनंदनायकी अशा अनेक ठिकाणी हा संदर्भ वापरला आहे त्यामुळे त्यांना प्रमाण मानून चालणाऱ्या अनेक अभ्यासकांनीही हाच कित्ता पुढे गिरवला आहे त्याला आधार म्हणून लोकगीतातील ज्योतिबा आणि यमाईचा विवाह याबाबत असलेल्या ओव्या देखील दिलेल्या आहेत परंतु विषयाचे व वस्तुस्थितीचे अल्पज्ञान असलेल्या लोकांच्या रचनांमुळे संदर्भाच्या झालेल्या अनेक चुका अनेक ठिकाणी पाहता येतात (छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवडी माळ परडी या विषयी अतिशयोक्ती पूर्ण कथा तुळजापूरात प्रसिद्ध आहे) त्यामुळे चैत्र यात्रेचा हा आनंद सोहळा नाथ केदार यमाई आणि जमदग्नींच्या भेटीसाठीच घडवतात हे मनामध्ये पक्के रुजले पाहिजे.