शिवसेना-मनसे युतीची होणार घोषणा ?

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र

0
80
As preparations for the upcoming municipal elections in the state are in full swing, everyone's attention is on the Thackeray brothers' political equation.
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

राज्यात आगामी महापालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरू असताना ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणावर सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाचा दसरा मेळावा, जो २ ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर होणार आहे, फक्त सणाचा उत्सव नसून, ठाकरे बंधूंमध्ये वैचारिक संवाद साधण्याची संधी ठरू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक देत आहेत.

मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर आयोजित मेळाव्यांमध्ये आधीच ठाकरे बंधू एकत्र दिसले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा देताना दिसले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती दर्शनासाठी गेले आणि नंतर मावशींना भेटायला परत आले. या सततच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अचानक चर्चेला गती मिळाली आहे.

सध्या प्राथमिक स्तरावर ठाकरे बंधूंमध्ये युती संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. आता दसऱ्याचा मुहूर्त साधून पुढील पावले उचलली जातील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः, या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दोन्ही भाऊ एकत्र दिसतील का, हा मोठा उत्सुक्याचा विषय ठरला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या संदर्भात म्हटले की, “ दसऱ्याच्या मुहूर्तावर वैचारिक ‘सोन्याचा आदान-प्रदान’ दोन बंधूंमध्ये होऊ शकतो.” तथापि, मनसेकडून निर्णय अंतिमतः राज ठाकरे घेतील, असे स्पष्टही त्यांनी केले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ५८ वर्षांची परंपरा आहे. याआधी बाळासाहेब ठाकरे विचारांचे सोनं वाटून शिवसैनिकांना आशीर्वाद देत असत, तर आता पक्षप्रमुख भाषण करून कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांना दिशा देतात. या परंपरेनुसार, यंदाचा दसरा मेळावा महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा प्रारंभ ठरणार आहे.

राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, दसरा मेळावा फक्त सणाचा कार्यक्रम नाही, तर ठाकरे बंधूंमध्ये कौटुंबिक भेटीतून वैचारिक संवाद साधण्याची संधीही ठरू शकते. युती संदर्भात कोणते पाऊल उचलले जाईल, हे दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर स्पष्ट होईल. तसेच, दोन भाऊ दसरा सणाच्या दिवशी एकत्र दिसतात का, यावरही सर्वांचे लक्ष असेल.

संपूर्ण महाराष्ट्राची नजर आता या दसऱ्याच्या मेळाव्यावर लागली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतात का, युती संदर्भात पहिले पाऊल उचलले जाते का, हे ठरवणार आहे की या सणाचा राजकीय परिणाम कितपत मोठा ठरेल.

———————————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here