Chief Minister Devendra Fadnavis has informed that the relief amount will be deposited in the accounts of farmers before Diwali.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात यंदा झालेल्या विक्राळ पावसाने कृषीक्षेत्रासह ग्रामीण जनजीवन पूर्ण उध्वस्त केले आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत रक्कम जमा होईल, अशी माहिती दिली आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, “संपूर्ण राज्यात जवळपास ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सरकारकडून दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.” यंदाच्या पावसामुळे खरिपाच्या तब्बल १ कोटी ४६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महापुराचे गंभीर परिणाम
या आपत्तीमुळे सुमारे ४७ टक्के खरिप क्षेत्र बाधित झाले असून खरिप हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. धाराशीव, जालना, बीड, लातूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत सर्वाधिक शेती उद्ध्वस्त झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे भाजीपाला, धान्य आणि अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यातच गाई-म्हशींचा मृत्यू आणि चाराही वाहून गेल्याने दुधाच्या उत्पादनावर मोठा फटका बसणार असून पुढील काळात अन्नधान्याबरोबरच दुधाच्या किमतीतही भरमसाठ वाढ होण्याची चिन्हे आहेत.
शेतकऱ्यांची बिकट स्थिती
या पुरामुळे ८६ शेतकऱ्यांचा बळी गेल्याची वृत्तपत्रांमध्ये नोंद आहे, जरी सरकारकडून अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबांची आर्थिक पाठराखण कोसळली आहे. अनेक कुटुंबांना रोजीरोटीचा प्रश्न भेडसावत असून मुलांचे शालेय साहित्य पाण्यात वाहून गेले किंवा भिजल्याने वापरण्यायोग्य राहिले नाही. शाळांची इमारत, वर्गातील साहित्य तसेच अंगणवाड्यांचे साधनसामग्रीही नष्ट झाल्याने मुलांच्या शिक्षणाचाही मोठा पेच निर्माण झाला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, मात्र शेतीतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.