मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये आघाडीवर असलेल्या झोमॅटोने ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देत एक महत्त्वाची पायरी टाकली आहे. कंपनीचे संस्थापक दिपिंदर गोएल यांनी आपल्या सोशल मीडिया ‘X’ (माजी ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत ‘हेल्दी मोड’ (Healthy Mode) ही नवी सुविधा सुरू केल्याची घोषणा केली.
गोएल यांची प्रांजळ कबुली
या पोस्टमध्ये गोएल यांनी झोमॅटोबाबतची दीर्घकाळाची खंत उघड केली. ते म्हणाले, “गेली अनेक वर्षे झोमॅटोबद्दल एक गोष्ट मला नेहमी सलत होती. आम्ही लोकांसाठी बाहेरून खाणे मागवणे आणि ते घरपोच करणे सोपे केले, पण लोकांना खऱ्या अर्थाने पौष्टिक (Nourishing) अन्न मिळेल यासाठी आम्ही मदत करू शकलो नाही. झोमॅटोवर सॅलड किंवा स्मूदी बोलसारखे पर्याय असले तरी, पौष्टिक अन्न शोधणे सोपे नव्हते. त्यामुळे ‘जास्तीत जास्त लोकांसाठी उत्तम अन्न’ (Better Food for More People) या आमच्या मिशनमध्ये ‘उत्तम’ या शब्दाला पुरेसा अर्थ नव्हता आणि याची खंत आम्हाला होती.”
हेल्दी मोड आणि हेल्दी स्कोअरची वैशिष्ट्ये
गोएल यांनी स्पष्ट केले की झोमॅटोचा हा ‘हेल्दी मोड’ हा फक्त एक साधा पर्याय नाही, तर तो तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केला गेला आहे.
-
या मोडमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रेस्टॉरंट्सकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे प्रत्येक पदार्थाला ‘हेल्दी स्कोअर’ दिला जाईल.
-
हा स्कोअर लो ते सुपर अशा श्रेणींमध्ये असेल.
-
हा स्कोअर केवळ कॅलरीवर आधारित न राहता, पदार्थातील प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स यांचा विचार करून दिला जाईल.
-
यामुळे ग्राहकांना एखादा डिश हेल्दी का आहे हे समजणे सोपे जाईल.