Domestic cooking gas (LPG) customers will now have the opportunity to change companies without changing their connections.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
घरगुती स्वयंपाक गॅस (LPG) ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आपल्या सध्याच्या एलपीजी गॅस पुरवठादाराच्या सेवेमुळे नाराज असलेल्या ग्राहकांना आता कनेक्शन न बदलता कंपनी बदलण्याची संधी मिळू शकते. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) प्रमाणेच, एलपीजी इंटरऑपरेबिलिटी (LPG Interoperability) या नव्या योजनेमुळे ग्राहकांना पुरवठादार बदलण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) या योजनेचा मसुदा तयार करून ग्राहक, वितरक आणि इतर भागधारकांकडून सूचना आणि मते मागवली आहेत. या सूचनांचा अभ्यास करून पुढील नियम व मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाणार असून त्यानंतर अंमलबजावणीची तारीख जाहीर केली जाईल.
पुरवठादार बदलण्याची गरज का ?
पीएनजीआरबीने प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, अनेकदा स्थानिक वितरकांना (Local Distributors) कामकाज करताना अडचणी येतात. परिणामी ग्राहकांसमोर पर्याय मर्यादित (Limited Options) राहतात आणि त्यांना वेळेवर सिलेंडर मिळण्यात अडथळे निर्माण होतात. सिलेंडरची किंमत सर्वत्र जवळपास समान असताना, ग्राहकाला इच्छेनुसार एलपीजी कंपनी किंवा डीलर निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, या गरजेतूनच इंटर ऑपरेबिलिटीचा प्रस्ताव पुढे आला आहे.
ऑक्टोबर २०१३ मध्ये तत्कालीन यूपीए (UPA) सरकारने १३ राज्यांतील २४ जिल्ह्यांमध्ये ‘पायलट पोर्टेबिलिटी’ (Pilot Portability) योजना सुरू केली होती. जानेवारी २०१४ पर्यंत याचा विस्तार देशभरातील ४८० जिल्ह्यांपर्यंत करण्यात आला. मात्र त्यावेळी ग्राहकांना केवळ डीलर बदलण्याचा मर्यादित पर्याय (Limited Option) मिळाला होता; तेल कंपनी (Oil Company) बदलण्याची परवानगी नव्हती. कायद्यानुसार एका विशिष्ट कंपनीचा सिलेंडर त्याच कंपनीकडे रिफीलसाठी जमा करणे बंधनकारक असल्याने कंपन्यांमध्ये पोर्टेबिलिटी शक्य नव्हती.
आता कंपन्यांमध्येही पोर्टेबिलिटी
पीएनजीआरबी आता कंपन्यांमध्ये पोर्टेबिलिटी (Portability between Companies) देण्याच्या दिशेने पुढे जात आहे. ग्राहकांना त्यांचे विद्यमान कनेक्शन कायम ठेवत इच्छेनुसार दुसऱ्या एलपीजी कंपनीकडून सिलेंडर घेता येईल. यामुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढेल, सेवा सुधारेल आणि ग्राहकांना वेळेवर व पारदर्शक दरात गॅस सिलेंडर मिळेल अशी अपेक्षा आहे.
या योजनेला अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर एलपीजी ग्राहकांसाठी ही मोठी क्रांती ठरणार असून देशभरातील गॅस वितरण व्यवस्थेत पारदर्शकता व गुणवत्ता वाढण्यास हातभार लागेल.