Due to continuous rains, water has accumulated on the edges of fields in Shirol taluka. (Photo: Anil Jasud)
अनिल जासुद : कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून सुरु झालेला पाऊस अजूनही थांबला नाही. यातच आता कोयनेसह वारणेतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शिरोळ तालूक्यात शुक्रवारी दुपारी साडेबाराला सुरु झालेला पाऊस न थांबता रात्रं – दिवस झोडपत आहे. यामुळे सर्वत्र ओढे नाले भरुन वाहत आहेत. तर शेत शिवारातील सरीमधून पाणीच पाणी साचून राहिले आहे. यामुळे काढणीस आलेल्या भुईमुग व सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच नुकताच ऊस लागण केलेल्या शिवारात पाणी साचून राहील्यामुळे अतिपाण्यामुळे ऊसरोपे करपून जाणार आहेत. यामुळे अशा शेतकर्यांसमोर दूबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
गेले दोन दिवसापासून रात्रं दिवस पावसाची सतंतधार सुरु आहे. शिरोळ तालुक्यात शुक्रवार दुपारपासून सुर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे शिरोळ तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाबरोबरच आता शनिवार सकाळपासून कोयनेसह वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज शनिवारी दुपारी दोन वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे २ फुटापर्यंत उघडुन यामधुन १८,७६४ क्युसेक विसर्ग , तसेच धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरु असुन याद्वारे २१०० क्युसेक विसर्ग असा कोयना धरणातुन एकुण २०,८६४ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.
पावसामुळे वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणात पाण्याची आवक सतत वाढत आहे. यामुळे परिचलन सुचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवार दि.२७ रोजी दुपारी एक वाजता धरणाच्या वक्र दरवाज्यातुन ३४७९ क्युसेक व विद्युत गृहातुन १६६० क्युसेक असा एकुण ५१०९ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे.
धरणपाणलोट क्षेत्रात पाऊस सतत सुरु राहिल्यास किंवा वाढल्यास, पाण्याची आवक वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाबरोबरच कोयना व वारणा धरणातूनही विसर्ग सुरु असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा – पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान शनिवारी सकाळी आठ वाजता राजापूर बंधार्याजवळ पाणी पातळी १५ फुट ९ इंच होती. ती सांयकाळी पाच वाजता १७ फुट ३ इंचावर गेली आहे. यावरुन कृष्णेच्या पाणी पातळीत दिवसभरात दीडफुटाने वाढ झाली आहे.कोयनेसह वारणेतून सोडलेले पाणी शिरोळ तालुक्यात आज पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
कृषी विद्युतपंप नदीकाठावरुन काढण्याचे आवाहन
शिरोळ तालुक्यात गणेशोत्सवापासून पाऊस झालेला नव्हता. तसेच उन्हाचा तडाखाही वाढला होता. यामुळे नदीतून पाणी उपसा करुन आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी नुकताच कृषीपंपधारक शेतकर्यांनी आपले कृषीपंप नदीकाठावर बसविले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे तसेच धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे. यामुळे कृषीपंपधारक शेतकर्यांना आपले कृषी विद्युतपंप नदीकाठावरुन सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागणार आहेत.
भुईमुग,सोयाबीन पिकास मोठा फटका
गेल्या दोन दिवसापासुन सुरु असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यात काढणीस आलेल्या भुईमुग,सोयाबीन पिकास मोठा फटका बसला आहे.सरीत पाणी साचून राहील्यामुळे भुईमुग शेंगास मोड येतात. तर पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा फुटुन जातात. यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होऊन संबधित शेतकर्यांचे अर्थिक नुकसान होणार आहे.