साखर हंगाम लवकर सुरू करा

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची मागणी

0
100
Multi-state sugar factories in Maharashtra have demanded from the State Cooperative Sugar Union to start the season from October 1.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम दरवर्षी प्रमाणे यंदाही १ ऑक्टोबर पासून सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात यंदा हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरू करण्याची प्राथमिक हालचाल असून, या पंधरा दिवसांच्या फरकाचा मोठा फटका राज्यातील साखर उद्योगाला बसण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामातच सुमारे २५ ते ३० लाख टन ऊस कर्नाटकात गेला, असा आकडा बहुराज्य साखर कारखान्यांनी दिला आहे.
कर्नाटकचा डाव, महाराष्ट्राची अडचण
कर्नाटकातील साखर कारखान्यांना लवकर गाळप सुरू करण्यासाठी कोणतेही शासकीय बंधन नाही. उलट, कारखान्यांनी दहा दिवस अगोदर गाळप सुरू केला तरी कारवाई होत नाही. त्यातच कर्नाटकातील कारखान्यांनी गाळप क्षमता प्रति दिवस २० ते २५ हजार टनांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ते त्यांच्या भागातील गाळप जलद पूर्ण करून महाराष्ट्रातील ऊसावर लक्ष केंद्रीत करतात. हंगामाच्या प्रारंभी आणि शेवटच्या टप्प्यात कर्नाटकातील कारखाने महाराष्ट्रातील उसावर डोळा ठेवतात, यामुळे राज्यातील बहुराज्य (मल्टीस्टेट) साखर कारखान्यांची डोकेदुखी वाढत आहे.
महाराष्ट्राला आर्थिक फटका
महाराष्ट्रात गाळप हंगाम सुरू करण्यासाठी शासकीय परवानगी बंधनकारक असून, नियोजित तारखेपूर्वी गाळप सुरू केल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. परिणामी, सीमावर्ती भागातील ऊस शेतकरी कर्नाटकातच ऊस विकण्याकडे वळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील आवाडे-जवाहर, पंचगंगा रेणुका, दत्त, गुरुदत्त, तर सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे, सिद्धेश्वर, भीमा यांसारख्या बहुराज्य कारखान्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. ऊसाची पळवापळवी वाढल्याने या कारखान्यांचे उत्पादन घटत असून, ग्रामीण अर्थकारणालाही त्याचा परिणाम होत आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील गाळप हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू झाला, तर कर्नाटकातील कारखान्यांनी कोणतेही अधिकृत धोरण न जाहीर करता दहा दिवस आधीच गाळप सुरू केले. महाराष्ट्रात मात्र नियोजित तारखेआधी गाळप सुरू केल्यास दंडाची तरतूद असल्याने कारखान्यांना तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे या परवानगी धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकीय पातळीवर हालचाली
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुराज्य साखर कारखान्यांनी राज्य सहकारी साखर संघाकडे १ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे, बबनराव शिंदे, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार गणपतराव पाटील, पी. एम. पाटील, माधवराव घाटगे यांसारखे दिग्गज नेते प्रयत्नशील आहेत. आता राज्य शासन, मंत्रिमंडळ आणि संबंधित समिती या मागणीवर कोणता निर्णय घेणार, याकडे संपूर्ण साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

साखर उद्योगाच्या मते, १ ऑक्टोबरपासून गाळप सुरू झाल्यास कर्नाटकात जाणारा महाराष्ट्रातील ऊस थांबेल, कारखान्यांचे उत्पादन वाढेल आणि ग्रामीण भागातील अर्थकारण अधिक सक्षम होईल. मात्र, राज्य शासनाने धोरणात तातडीने बदल केला नाही, तर कर्नाटकातील लवकर सुरू होणाऱ्या हंगामाचा आर्थिक फटका यंदाही महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे.

———————————————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here