मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनची प्रस्थान प्रक्रिया लांबली असून, राज्यातील अनेक भागांमध्ये २६ सप्टेंबर पासून ५ ऑक्टोबर पर्यंत ढगाळ हवामान आणि पावसाचे सत्र सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज जाहीर केला आहे.
पावसाचा अंदाज
-
२६ सप्टेंबर : दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्याच्या जवळच्या भागांमध्ये दुपार नंतर ढगाळ हवामान आणि पावसाची वाढ अपेक्षित आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता जास्त आहे. उर्वरित विदर्भ व मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
२७ सप्टेंबर : दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्हे समाविष्ट आहेत. दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम, तर मराठवाडा लगतच्या सोलापूरमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. खानदेशात प्रामुख्याने हलका पाऊस पडेल.
-
२८ सप्टेंबर : कोकण आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्येही मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मुंबई महानगर परिसरात (मुंबई शहर, ठाणे, पालघर) हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम, उर्वरित विदर्भात हलका पाऊस अपेक्षित आहे.
नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
-
पूर आणि धरण साठा : दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरण साठ्यात वाढ होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवाहन केले आहे.
-
शेती संदर्भातील खबरदारी : कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्यास सांगितले आहे. विशेषतः काढणी केलेली पिके पावसापासून आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.