कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात अनेक भागात सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हणूनच आरोग्य विभागात नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, २५ व २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सुरु असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मागच्या आठवड्याापासून अति मुसळधार पाऊस असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे अवघड झाले आहे. यामुळे सर्व परीक्षार्थींचे पुढील होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, २५ व २६ सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. या संदर्भातील सुधारीत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती आयुक्तालयाने दिली आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासत राहावी, असे आवाहन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
एमपीएससीही पुढे ढकलण्याची मागणी
दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मराठवाड्यातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ती घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की, कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भाने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.