spot_img
मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025

9049065657

Homeशिक्षणशिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य

शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य

नापास झाल्यास नोकरी गमावण्याची शक्यता

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यंदाच्या महा-टीईटी परीक्षेची घोषणा केली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही परीक्षा येत्या २३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मात्र, ही तारीख ऐन दिवाळीच्या सुट्टीतच आल्याने शिक्षकांसाठी हा काळ चिंतेचा ठरत आहे.

२०१३ पासून टीईटी बंधनकारक

शालेय शिक्षण विभागाने २०१३ पासून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीईटी देणं बंधनकारक केलं होतं. परंतु, अलीकडील न्यायालयीन आदेशानुसार ही अट आता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्वच शिक्षकांवर लागू करण्यात आली आहे. म्हणजे, प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळांतील प्रत्येक शिक्षकाने टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे.

राज्यात तब्बल  ८७,४४०  प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये ४ लाख ७९ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी अंदाजे १ लाख ४९ हजार शिक्षकांना टीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ५३ वर्षांवरील शिक्षकांना दोन वर्षांच्या आत ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. ५५ वर्षांपर्यंत पात्रता सिद्ध न केल्यास सक्तीची निवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय, पदोन्नतीसाठी देखील टीईटी उत्तीर्ण असणं आवश्यक करण्यात आलं आहे. त्यामुळे सेवेत असलेला ज्युनिअर शिक्षकही टीईटी उत्तीर्ण असल्यास ज्येष्ठ शिक्षकांपेक्षा आधी मुख्याध्यापक होऊ शकतो.
दिवाळीतच अभ्यासाची कसरत

सामान्यतः दिवाळीच्या सुट्टीत शिक्षक विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊन स्वतः आराम करतात; पण यंदा शिक्षकांनाच अभ्यासाचा फडशा पाडावा लागणार आहे. दिवाळीचा उत्सव, शाळाबाह्य जबाबदाऱ्या, निवडणूक कामांचा ताण आणि कमी मनुष्यबळ यामुळं आधीच त्रस्त असलेल्या शिक्षकांना या परीक्षेमुळे अतिरिक्त ताण जाणवतो आहे.

संघटनांचा विरोध

टीईटीला पदोन्नतीची अट जोडल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. “ज्येष्ठ शिक्षकांना अल्पावधीतच परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती हा अन्याय” असा सूर अनेक संघटनांनी लावला आहे. तथापि, शिक्षण विभागानं राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आता दिवाळीच्या प्रकाशात शिक्षकांच्या भविष्याचा अंधार दूर करण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणं हेच मुख्य आव्हान ठरणार आहे. आगामी आठवडे शिक्षकांसाठी अभ्यास, नियोजन आणि जिद्दीची खरी कसोटी असणार आहे.

———————————————————————————————————————–
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments