On the fourth day of the Sharadiya Navratri festival, Shri Ambabai Devi, the abode of Karveer, is adorned in the form of Matangi.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीरच्या निवासिनी श्री अंबाबाई देवी मातंगी रूपात अलंकृत झाली आहे. आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५, शके १९४७ च्या तृतीया वृद्धी तिथीला देवीचे मातंगी रूप दर्शनासाठी भाविक मोठ्या उत्साहाने गर्दी करत आहेत.
पुराणकथांनुसार, हिमालयाने आपल्या घरी आदिशक्तीला कन्या रूपात अवतार घ्यावा म्हणून जगदंबेची उपासना केली. त्यावेळेस भगवती ललिता पार्वतीच्या रूपात हिमालयाच्या घरी अवतीर्ण झाल्या. हिमालयाचा मित्र असणाऱ्या मातंग मुनींनी ललितेची प्रिय सखी असणाऱ्या राजशामलेची उपासना केली आणि त्या क्रियेमुळे भगवती राजश्यामला कन्या रूपात प्रकट झाल्या. मातंग ऋषींची कन्या म्हणून त्या मातंगी या नावाने ओळखल्या गेल्या.
मातंगी देवी संगीत आणि विद्या यांची देवता म्हणून प्रसिद्ध आहेत. तिच्या उपासकांमध्ये संगीत, कला आणि विद्या यांचे अत्यंत सन्मान केले जातात. गायक, वादक आणि विद्या संपन्न व्यक्तींना विशेष मान दिला जातो, कारण वाद्यांचा किंवा संगीताचा अपमान हा मातंगी देवीचा अपमान मानला जातो.
पुरातन ग्रंथांत असेही उल्लेख आहेत की मातंगी देवी पराशक्तीच्या प्रत्येक अवताराच्या वेळेस अवतार धारण करत असते. रेणुका अवतारात मातंगीचे मस्तक जाळून रेणुकाला पुनर्जीवित करण्यात आले आणि भवानीच्या अवतारात मतंग नावाच्या दैत्याचा संहार करण्यासाठी देवी स्वतः युद्धात उतरल्या, असे तुरजा महात्म्य ग्रंथात सांगितले आहे.
आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई हातामध्ये ढाल, अंकुश, चंद्रहास, खड्ग आणि पाश धारण करून सव्य ललिता सणात विराजमान आहेत. भक्तजनांनी दीप, पुष्प आणि नैवेद्य अर्पण करून देवीच्या कृपेची प्रार्थना केली. करवीर निवासिनीच्या कृपेच्या सुरांनी भाविकांचे आयुष्य सुरेल आणि मंगलमय व्हावे, हीच या चौथ्या दिवशी चरणी प्रार्थना होत आहे.