सण-उत्सवात राजकीय फलकबाजी

कोल्हापूर शहराचे विद्रुपीकरण

0
85
In the backdrop of the upcoming municipal elections, there has been a surge in billboard advertising in the city.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात फलकबाजीला उधाण आले आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसारख्या सणांचा वापर करून अनेक इच्छुकांनी डिजिटल फलक, कमानी आणि पोस्टरद्वारे स्वतःचा प्रचार सुरू केला आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे राजकीय उमेदवारांसाठी शेजारी प्रभागांमध्ये पोहोचणे गरजेचे आहे; मात्र, या साधनांचा अवाढव्य वापर शहराच्या सौंदर्यावर घाला घालत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बसथांबे, वीज खांब, शासकीय इमारती, पादचारी मार्ग कुठेही नजर टाकली तरी शहर पोस्टर बाजीच्या विळख्यात आहे. बहुतांशी केएमटी बस थांबे झाकले गेले आहेत परिणामी प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मिळत नाही, रस्त्यावरील कमानी वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत, तर भाविक व पादचारी मार्गही झाकले गेले आहेत. परिणामी नागरिकांमध्ये संताप वाढतोय आणि शहराचे सौंदर्य झाकोळले गेले आहे.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी जाहिरात बाजीसाठी सढळ हाताने पैसा खर्च करत आहेत, पण यामध्ये कायदेशीर मर्यादा आणि सार्वजनिक हित विसरले गेल्याचे दिसते. सार्वजनिक जागा ही केवळ प्रचारासाठी नाही; ती नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, वाहतूक सुरक्षेसाठी आणि शहराच्या सौंदर्यासाठी आहे. फलकबाजीमुळे केवळ अपघाताची शक्यता वाढली नाही, तर सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते आहे.

निवडणूक आयोग, महापालिका प्रशासन आणि पोलीस यांना या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे लागेल. जर उमेदवार आणि पक्ष हे शहराच्या सौंदर्य, सार्वजनिक सुरक्षितता व नागरिकांच्या सोयीसंदर्भात जबाबदार न राहिले, तर निवडणुकीच्या प्रक्रियेशीही नागरिकांचा विस्वास धोक्यात येईल.

सणांचा अर्थ उत्सव व भक्ती असतो; पण कोल्हापूर सारख्या सांस्कृतिक शहरात सणांचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जाणे ही चिंता वाढवणारी बाब आहे. प्रशासनाने फलकबाजीवर कठोर कारवाई करून शहराचे सौंदर्य आणि नागरिकांचे हित संरक्षित करण्याची तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

—————————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here