मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीलाही लागू करणार, जेथे पंचनाम्यांसाठी पोहचणे शक्य नाही, अशा ठिकाणी ड्रोनद्वारे पंचनामे तसेच मोबाईलवरील फोटोही स्वीकारणार, यासह सहा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूर आपत्तीग्रस्तांसाठी घेतले. फडणवीस यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन सहा निर्णय पोस्ट करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांची वाहून गेलेली पिकं-गुरंढोरं, घरांमध्ये शिरलेले पाणी, उद्ध्वस्त झालेले संसार… हे सर्व पाहून मन विषण्ण झाले.
“अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान प्रचंड आहे, पण अशा संकटावर मात करण्याची ताकद महाराष्ट्राच्या मातीत आणि बळीराजाच्या मनगटात आहे आणि सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या आपत्तीत शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेती, घरे, शाळा, रस्ते, सार्वजनिक सुविधा जेथे-जेथे मदतीची गरज आहे तेथे शासन शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असं मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं आहे.
“आपली जवळची माणसं, पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेली पिकं, जनावरं जेव्हा डोळ्यासमोर वाहून जातात, तेव्हा त्यांच्या मनाला होणार्या वेदनांची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच निकषात न अडकता जास्तीत जास्त मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाने आधीच २२०० कोटी रुपयांची तातडीची मदत दिली आहे, पुढेही गरजेनुसार निधी उपलब्ध करून देऊ,” असं फडणवीस यांनी सांगितले.
सहा निर्णय असे :
-
टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीलाही लागू करणार
-
उजनी येथे तेरणा नदीवर पूल, गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी
-
औराद शहाजनी येथे पूर संरक्षक भिंत, बॅरेजेसची कामेही केली जाणार
-
उजनी गावालगत तेरणा नदीवर औसा व तुळजापूर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाच्या उभारणीला मंजुरी देणार
-
उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देणार
-
जेथे पंचनाम्यांसाठी पोहचणे शक्य नाही, अशा ठिकाणी ड्रोनद्वारे पंचनामे तसेच मोबाईलवरील फोटोही स्वीकारणार