The Air Force has taken a historic decision to purchase as many as 97 Tejas Mark-1A fighter jets.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारतीय वायूदलाच्या लढाऊ क्षमतेत मोठी झेप घेणारा निर्णय अखेर निश्चित झाला आहे. वायूदलाने तब्बल ९७ तेजस मार्क-१ ए लढाऊ विमानं खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यासाठी हिंदुस्तान एअरोनॉटिकल्स लिमिटेड ( एचएएल ) सोबत ६६,५०० कोटी रुपयांचा आजवरचा सर्वात मोठा करार होणार आहे. हा करार लवकरच अधिकृतपणे करण्यात येणार आहे.
मिग-२१ युगाची सांगता
भारतीय वायूदलातील ३६ जुनी मिग-२१ लढाऊ विमानं येत्या शुक्रवारी सेवेतून निवृत्त होणार आहेत. गेल्या अनेक दशकांपासून वायूदलाच्या शौर्याचा भाग असलेली ही विमानं आता तांत्रिक मर्यादा आणि सुरक्षा धोक्यांमुळे हळूहळू हटवली जात आहेत. त्यांच्या निवृत्तीमुळे वायूदलाच्या ताफ्यात लढाऊ विमानांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. हाच शून्य भरून काढण्यासाठी नव्या तेजस विमानांची तातडीने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वायूदलाची तातडीची गरज
सध्या भारतीय वायूदलकडे फक्त २९ फायटर स्क्वाड्रन्स आहेत, जे चीन किंवा पाकिस्तानकडून उद्भवणाऱ्या धोके लक्षात घेता अपुरे मानले जातात. वायूदलाच्या अंतर्गत अहवालानुसार, दोन्ही शेजारी देशांविरुद्ध एकाचवेळी लढाईची वेळ आली तरी ४२ स्क्वाड्रन्स देखील पुरेसे नसतील. त्यामुळे वायूदल दरवर्षी किमान ४० नव्या लढाऊ विमानांची मागणी सातत्याने करत आहे. ९७ नव्या तेजस विमानांचा करार या मागणीची काहीअंशी पूर्तता करणार आहे.
एअर मार्शल ए. पी. सिंह यांनी अलीकडेच सांगितले होते की, “भारतीय वायूदल लढाऊ विमानांच्या बाबतीत सध्या कमकुवत स्थितीत आहे. दरवर्षी ४० नव्या विमानांची आवश्यकता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले होते.
याआधी फेब्रुवारी २०२१ मध्ये ८३ तेजस मार्क-१ ए विमानांच्या खरेदीचा ४६,९८९ कोटी रुपयांचा करार झाला होता. त्यानुसार एचएएलने फेब्रुवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२८ दरम्यान ही विमानं वायूदलाला सुपूर्द करायची आहेत. मात्र, अद्याप या करारातील एकही विमान वायूदलाला मिळालेले नाही. एचएएलच्या माहितीनुसार, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत दोन तेजस विमानं भारतीय वायूदलाकडे सुपूर्द केली जाण्याची शक्यता आहे.
स्वदेशी तेजसचे वैशिष्ट्ये
तेजस मार्क-१ ए हे पूर्णपणे भारतात विकसित केलेले, हलके पण अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. अत्याधुनिक रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, शक्तिशाली इंजिन आणि आधुनिक शस्त्रास्त्रांसह हे विमान हवाई सुरक्षा बळकट करण्यास सक्षम आहे.
९७ नव्या तेजस विमानांच्या खरेदीमुळे भारतीय वायूदलाची ताकद अनेक पटींनी वाढेलच, पण ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही मोठा आधार मिळेल. परदेशी विमानांवरील अवलंबित्व कमी करून देशातील संरक्षण उद्योगाला चालना देणारा हा करार शत्रूराष्ट्रांसाठी धडकी भरवणारा ठरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.