कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मराठवाडा विभागात वर्षानुवर्षे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा मुसळधार पावसाने अभूतपूर्व संकट ओढावलं आहे. सलग पावसामुळे अहिल्यानगर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, २००५ तसेच २०१९ आणि २०२१ मध्ये महापुराचा तीव्र फटका बसलेला कोल्हापूर जिल्हा मराठवाड्याच्या मदतीला धावला आहे.
मराठवाड्यात नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक खेडी पाण्याखाली गेली असून रस्ते, घरं, पाणीपुरवठा योजना आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीन, तूर, कापूस आणि मका या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असले तरी काही दुर्गम भागात बचाव पथकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत.
कोल्हापूरमधील व्हाईट आर्मीची तुकडी आधीच सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली असून मध्यरात्री उत्तर सोलापूर आणि माढा तालुक्यातील गावांमध्ये १८० हून अधिक नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. शिंगेवाडी (ता. माढा) गावातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या २५ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यामध्ये द्रौपदी लक्ष्मण शिंदे (वय ६४ ) या लकवा असलेल्या महिलेचाही समावेश आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकही बचाव कार्यासाठी दाखल झाले आहे.
काँग्रेस विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सोशल मीडिया वरून मराठवाड्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “ आपण कोल्हापूरकरांनी महापुराचा वेदनादायक अनुभव घेतला आहे. त्या काळात देशभरातून आपल्याला मदतीचा हात मिळाला होता. आता मराठवाडा संकटात आहे, आणि मदतीचा हात पुढे करणे ही आपली जबाबदारी आहे. तुमची छोटीशी मदतही पुरग्रस्तांसाठी जीवनरेखा ठरेल.”
या आवाहनानुसार कोल्हापूरकरांनी २४ ते २८ सप्टेंबर दरम्यान मदत साहित्य जमा करण्याचं ठरवले असून २९ सप्टेंबर रोजी मदतीचा पहिला ट्रक मराठवाड्याकडे रवाना होणार आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी कोल्हापूरकरांकडून होत असलेली ही मदत पूरग्रस्तांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
————————————————————————————————-