spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeअध्यात्मकरवीरनिवासिनी आज बगलामुखी रूपात

करवीरनिवासिनी आज बगलामुखी रूपात

अंतस्थ शत्रूंचा नाश करणाऱ्या रक्षक शक्तीचे दर्शन

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या द्वितीया तिथीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची आज महाविद्यांपैकी बगलामुखी या अद्भुत स्वरूपात सजल्या. मंदिर परिसरात सकाळ पासूनच भक्तांची मोठी गर्दी होत असून पिवळ्या रंगाच्या अलंकारात प्रकटलेल्या पितांबरा रूपातील देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

धार्मिक आख्यायिकेनुसार, कृतयुगात भयंकर वातक्षोभ ( वादळ ) निर्माण झाल्यावर भगवान नारायणांनी सौराष्ट्र देशातील हरिद्रा तीर्थावर कठोर तप केले. त्या तपावर प्रसन्न होऊन वीररात्र, चतुर्दशी-मंगळवार योग आणि मकरयुक्त नक्षत्रावर महात्रिपुरसुंदरी प्रगट झाली. तिच्या हृदयातून प्रकटलेल्या पीतवर्णीय ज्वालेतून द्विभुजा बगलामुखी देवी उदयास आली आणि त्या ज्वालेने वातक्षोभाचे शमन केले. पिवळ्या वस्त्रांमुळे तिला पितांबरा असेही संबोधले जाते.

बगलामुखी देवीचे ध्यान करताना ती एका हाताने शत्रूची जीभ पकडून ओढताना व दुसऱ्या हातात मुद्गर घेऊन शत्रूला प्रहार करताना दर्शवली जाते. चतुर्भुजा स्वरूपात तिच्या हातात वज्र आणि पाश अशी दोन अतिरिक्त आयुधे असल्याचे मानले जाते. भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी कूर्म अवताराशी या देवीचा संबंध असून तिचा सदाशिव त्र्यंबक भैरव किंवा आनंद भैरव ( मृत्युंजय ) या नावाने ओळखला जातो.

तंत्रशास्त्रानुसार, बगलामुखीची उपासना शत्रूच्या स्तंभनासाठी म्हणजे शत्रूची शारीरिक व बौद्धिक ताकद थांबवण्यासाठी केली जाते. इतरांनी केलेल्या अभिचार कर्मातून मुक्तता मिळवण्यासाठीही ती सत्वर फळ देणारी मानली जाते. परंतु अधिकारी गुरुशिवाय आणि प्रबळ कारणाशिवाय ही उपासना आत्मघातासमान ठरते, असा इशारा शास्त्रात दिला आहे. प्रत्यक्षात तंत्रोक्त देवता या इतरांना त्रास देण्यासाठी नसून आत्मउन्नतीसाठी आहेत. बगला हा शब्द वल्गा (लगाम) याचा अपभ्रंश असून, शत्रूच्या कृतींना लगाम घालणारी शक्ती अशी तिची ओळख आहे. मुख हा शब्द ‘तोंड’ नसून ‘बाहेर पडण्याचा मार्ग’ या अर्थाने घेतला जातो. त्यामुळे भगवतीच्या रक्षक शक्तीचा नि:सारण मार्ग म्हणजेच बगलामुखी असे तिचे नामाभिधान मानले जाते.

आज करवीर निवासिनी महालक्ष्मीचे हे बगलामुखी रूप अंतस्थ शत्रू अहंकार, लोभ, मत्सर  यांचा नाश करून शाश्वत सुखाकडे वाटचाल करण्यासाठी भक्तांना प्रेरित करणारे ठरावे, हीच जगदंबा चरणी प्रार्थना आहे.
—————————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments