कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
हल्ली स्वस्त, आकर्षक आणि टिकाऊ म्हणून अनेक जण प्लास्टिकच्या प्लेट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. बाजारात विविध रंग, आकार आणि डिझाईनमुळे प्लास्टिकच्या विविध वस्तू सहज उपलब्ध असली तरी अनेक संशोधनांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
संशोधकांचे म्हणणे आहे की, जेव्हा गरम अन्न किंवा इतर गरम पदार्थ प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये ठेवले जातात, तेव्हा त्यातील रसायने अन्नात मिसळण्याची शक्यता असते. विशेषतः ‘बीपीए’ (Bisphenol A) नावाचे रसायन प्लास्टिक तयार करताना वापरले जाते. बीपीए प्रामुख्याने पॉली कार्बोनेट किंवा पीईएलआय (Polyethylene) प्रकारातील प्लास्टिकमध्ये असते. हे रसायन शरीरासाठी अत्यंत विषारी ठरू शकते आणि कर्करोग, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवते.
बीपीए हे शरीरात प्रवेश केल्यानंतर ट्रोजेन सारख्या हार्मोन्सचे संतुलन बिघडवते. हार्मोन्स असंतुलनामुळे मूड स्विंग, निद्रानाश, चिडचिड, तणाव, तेलकट त्वचा, चिंता अशा समस्या निर्माण होऊ शकतात. महिलांमध्ये तर वंध्यत्वाचा त्रास आणि इतर हार्मोनल विकारही होण्याची शक्यता असते. शरीरातील एस्ट्रोजेन हार्मोन असंतुलनामुळे कर्करोग आणि हृदयरोग यांचा धोका अधिक वाढतो.
याशिवाय मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यासाठी प्लास्टिकच्या प्लेट्स वापरणेही धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मायक्रोवेव्हच्या उष्णतेमुळे प्लास्टिक मधील सूक्ष्म कण अन्नात मिसळतात आणि नंतर शरीरात प्रवेश करतात. यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन :
-
गरम पदार्थांसाठी प्लास्टिकच्या प्लेट्स वापरणे टाळा
-
शक्यतो स्टील, काच किंवा मातीपासून बनवलेल्या प्लेट्सचा वापर करा
-
‘BPA Free’ प्रमाणपत्र असलेली उत्पादनेच खरेदी करा
-
मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताना प्लास्टिक वापरणे टाळा
-
वापरलेली प्लास्टिकची भांडी वेळोवेळी बदलून सुरक्षित पर्याय स्वीकारा