नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्या साहाय्याने वाढलेल्या आणि घडलेल्या जनरेशन झेडने ( Gen Z ) जगभरातील प्रचलित राजकीय व्यवस्थेला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. १९९६ नंतर जन्मलेली ही पिढी केवळ शिक्षण घेणारी किंवा नोकरी शोधणारी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढणारी, प्रश्न विचारणारी आणि परिवर्तन घडवून आणणारी शक्ती म्हणून उदयास आली आहे. ट्युनिशियाच्या गल्लीपासून नेपाळच्या चौकांपर्यंत, श्रीलंकेच्या गेटपासून बांगलादेशच्या विद्यापीठांपर्यंत तरुणाईचा आक्रोश ऐकू येतो आहे.
ट्युनिशियातून सुरुवात – अरब स्प्रिंगचा धगधगता मशाल
मोहम्मद बुआझिझीने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना फेसबुकवर व्हायरल होताच अरब स्प्रिंगचा उद्रेक झाला. त्यानंतर ट्युनिशिया आणि इतर देशांमध्ये दडपशाही विरोधात आंदोलनं उसळली. सोशल मीडियाने संतापाला दिशा दिली, संवादाचा मार्ग उघडला आणि लोकांमध्ये परस्पर विश्वास निर्माण केला.
नेपाळ – सोशल मीडिया बंदीने पेटवले आंदोलन
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर संतप्त तरुणाईने क्षणार्धात विरोधाचा ज्वालामुखी उफाळून आणला. डिस्कॉर्डवरील गुप्त गट, इन्स्टाग्राम स्टोरीज आणि हॅशटॅग्सच्या माध्यमातून आंदोलनाचे नियोजन झाले. चारच दिवसांत देशभर निदर्शने सुरू झाली. भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी विरुद्ध आवाज बुलंद करणाऱ्या तरुणाईने पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला सुशीला कार्की पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. या निवडीत तरुणाईचा मोठा वाटा होता.
श्रीलंका – #GoHomeGota ने निर्माण केली जागतिक चर्चा
आर्थिक दिवाळखोरी आणि व्यवस्थापनातील अपयशामुळे असंतोष वाढलेल्या श्रीलंकेत ट्विटरवरील #GoHomeGota हॅशटॅगने आंदोलनाचे स्वरूप घेतले. सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो आणि थेट प्रक्षेपणांमुळे जगाचे लक्ष वेधले गेले आणि राजकीय नेतृत्वावर जबाबदारीची मागणी वाढली.
बांगलादेश – विद्यार्थ्यांचे डिजिटल नेतृत्व
रस्ता सुरक्षा, शिक्षण आणि रोजगाराच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर संघटन केले. आंदोलनाचे व्हिडिओ देशभर व्हायरल झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवून दिला. सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर तरुणाई मार्गदर्शक बनली आहे.
हाँगकाँग – दडपशाही विरोधातील डिजिटल प्रतिकार
लीडरलेस चळवळीचे यश दाखवत हाँगकाँग मधील तरुणांनी LIHKG आणि टेलिग्राम वरून रणनीती आखून सरकारच्या दडपशाहीला प्रत्युत्तर दिले. त्यांच्या संवाद आणि संघटन क्षमतेने आंदोलनाला टिकवून ठेवले.
तरुणाई अस्वस्थ का आहे ?
-
शिक्षण असूनही बेरोजगारी
-
भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुळे संधींचा अभाव
-
हवामान संकट आणि पर्यावरणीय असुरक्षितता
-
डिजिटल सेन्सॉरशिप मुळे अभिव्यक्तीवर गदा
-
आर्थिक असमानता आणि भविष्याची धूसरता