कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता आजपासून सुरू करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाची तयारी म्हणून दरवर्षी प्रमाणे एकादशी दिवशी गर्भगृहाची स्वच्छता केली जात असून, त्यासाठी आज मुख्य देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
स्वच्छतेचे काम सकाळी साडे नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर संध्याकाळी साडे सहा ते सात वाजेपर्यंत काही तांत्रिक कामांसह स्वच्छतेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या दरम्यान गाभाऱ्यात प्रवेश बंद ठेवण्यात येणार असून, भाविकांनी मंदिर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी दर्शनाची सुविधा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांसाठी सरस्वती मंदिराजवळ देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन उपलब्ध करून दिले आहे. मुख्य देवीचे दर्शन बंद असले तरी उत्सव मूर्तीच्या दर्शनाने भक्तांना नवरात्राची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. संध्याकाळी सात वाजल्यानंतर देवीचे नित्य दर्शन पूर्ववत सुरू होईल.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता आय स्मार्ट फॅसिटेक कंपनीचे कर्मचारी गाभार्याच्या स्वच्छतेला सुरुवात करणार आहेत. वॉटर जेट मशिनच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यावेळी अंबाबाईच्या मूर्तीला इरल्याने आच्छादित करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत गाभार्याची स्वच्छता पूर्ण करण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.