An extension of six more days is being given for crop registration at the farmer level.
पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ करीता ई-पीक पाहणीची प्रक्रिया दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली होती. महसूल विभागाने विकसित केलेल्या ‘ई-पीक पाहणी मोबाईल अॅप ’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार होते.
मात्र, राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी, दुबार पेरणी आणि अन्य कारणांमुळे अनेक शेतकरी वेळेवर पीक नोंदणी पूर्ण करू शकले नाहीत. यामुळे शेतकरी पीक नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक २० सप्टेंबर २०२५ पर्यंत म्हणजेच आणखी सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली नाही त्यांनी या कालावधीत अॅपच्या माध्यमातून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, या मुदतीनंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी दिनांक २१ सप्टेंबर २०२५ ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहायक स्तरावरून पूर्ण केली जाईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
ही माहिती राज्य संचालक, महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या पत्राद्वारे सर्व विभागस्तरावर प्रसारित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.