कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
चित्रपटाची कथा आणि प्रसंगाशी सुसंगत याचबरोबर सर्वसामान्य प्रेक्षकांना प्रिय वाटावे असे संगीत. शास्त्रीय संगीताचा प्रभावी वापर. वाद्यवृंदाचा मोठा ताफा. महम्मद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांचा आवाज यामुळे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलेली गाणी आजही आवडीने ऐकाविशी वाटतात. या संगीतकार जोडीतील लक्ष्मीकांत यांचा आज – १० सप्टेंबर स्मृतिदिन. यानिमित्त लक्ष्मीकांत अर्थात लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांच्याविषयी…
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३७ रोजी मुंबईत तेव्हाच्या बंबईत झाला. लक्ष्मीकांत लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे लक्ष्मीकांत यांचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. ही आवड पाहून त्यांना संगीत शिकवण देण्यात आली. लक्ष्मीकांत प्रथम उस्ताद हुसैन अली यांकडून, नंतर बालमुकुंद इंदूरकरांमार्फत मेंडोलिन, तसेच हुस्नलाल यांच्याकडून वायलिन शिकले. बाल कलाकार म्हणून त्यांनी “भक्त पूंडलिक” (१९४९) आणि “आँखें” (१९५०) या चित्रपटांमध्ये भूमिका केली.
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ घडवणाऱ्या संगीत दिग्दर्शकांच्या यादीत लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या सहकारी प्यारेलाल शर्मा यांच्यासोबत “लक्ष्मीकांत-प्यारेलाल” या द्वयीच्या नावाने संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.
लक्ष्मीकांत यांनी आपल्या करिअरची सुरुवात संगीत सहाय्यक म्हणून केली. त्यांची आणि प्यारेलाल यांची मैत्री लहानपणापासूनची होती आणि पुढे तीच जोडी एक यशस्वी संगीत दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आली. त्यांनी १९६३ मध्ये “पारसमणी” या चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ह्या चित्रपटाचे गीते प्रचंड गाजली आणि त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.
“बॉबी” (१९७३) या चित्रपटातील “मैं शायर तो नहीं…”, “हम तुम एक कमरे में बंद हो…”, त्यांची ही गाणी हिट ठरली. त्यांनी पुढे “रोटी कपड़ा और मकान”, “दोस्ती”, “नागिन”, “अमर अकबर एंथनी”, “परवरिश”, “धरमवीर” यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी लोकप्रिय गाणी दिली. त्यांच्या संगीताने शंकर‑जयकिशन युगाला उत्तर दिले आणि १९७० च्या दशकात प्रमुख संगीतकार जोडी म्हणून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा उदय झाला
लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे ७५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांची गीते आजही लोकांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत. “दोस्ती” (१९६४) या चित्रपटासाठी त्यांना त्यांचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांनी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, मन्ना डे अशा दिग्गज गायक-गायिकांसोबत काम केले.
लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांची जोडी अतिशय समंजस होती. त्यांनी सहकाऱ्यांशी उत्तम संबंध ठेवून उद्योगात सातत्य राखले. त्यामुळे त्यांनी ३५ वर्षांहून अधिक काळ कारकिर्द टिकवली. लक्ष्मीकांत यांचे जीवन हे संघर्ष, मेहनत आणि कलेवरील निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांच्या संगीतातील जादू ही आजही जशीच्या तशी टिकून आहे. ते एक महान संगीतकार होते, जे आपल्या सुरांनी लाखो लोकांच्या मनावर राज्य करत राहतील.
—————————————————————————————————–






