The state government today issued orders to maintain a separate register of doctors who have completed the CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) course with the Maharashtra Medical Council (MMC).
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य सरकारने सीसीएमपी ( Certificate Course in Modern Pharmacology ) कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (MMC) स्वतंत्र नोंद वहीत करण्याचे आदेश आज जारी केले. या निर्णयामुळे सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मर्यादित स्वरूपात आधुनिक औषधोपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०१४ पासून सुरू असलेली प्रक्रिया
२०१४ साली राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आधुनिक औषधशास्त्रांवर आधारित सीसीएमपी कोर्स सुरू केला होता. ग्रामीण व दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम करणे हा या उपक्रमामागचा उद्देश होता. या कोर्ससंदर्भात ३० जून २०२५ रोजी सरकारने आदेश काढून, कोर्स पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंद MMC कडे करण्याचे निर्देश दिले होते.
IMA चा विरोध आणि न्यायालयाचा निर्णय
सरकारच्या या निर्णयाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) पुणे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा नाकारत, राज्य सरकारच्या आदेशावर स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला.
सरकारचा अंतिम आदेश
उच्च न्यायालयाच्या भूमिकेचा विचार करून, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने आज अधिकृत आदेश जारी केले. यानुसार, सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी आता स्वतंत्र नोंदवहीत केली जाणार आहे.
दिलासा आणि समाधान
मध्यंतरी होमिओपॅथी विरुद्ध ऍलोपॅथी डॉक्टरांमध्ये संघर्ष रंगला होता. परंतु, सरकारच्या या निर्णयामुळे अखेर होमिओपॅथी डॉक्टरांना कायदेशीर मान्यता मिळाली असून, अनेक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.