मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आणि आजही हशांचा महापूर ओतणारा सिनेमा म्हणजे साडे माडे तीन. या सिनेमाच्या पहिल्या भागातील कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचं निरागस प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से प्रेक्षकांना कायम भावले. आता या यशस्वी चित्रपटाचा सिक्वेल ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या नेहमीच्या अवखळ अंदाजात दिसत आहेत. त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधवदेखील धमाल करणार आहे. या चौकडीच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव, त्यांचा भन्नाट लूक पाहून पुन्हा एकदा हास्याचा महापूर येणार हे स्पष्ट होत आहे.
या धमाल चौकडीत रिंकू राजगुरूचाही ताजातवाना अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सैराटमधील दमदार अभिनयानंतर रिंकू पहिल्यांदाच अशा कॉमेडीपटात झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
दिग्दर्शक – अंकुश चौधरी
“ या वेळची जबाबदारी जास्त मोठी होती. पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र कलाकार, निर्माते, पटकथा आणि संवाद लेखक संदीप दंडवते आणि तंत्रज्ञ यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत. हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे.”



