कुरुंदवाड :अनिल जासूद
ऑगस्ट महिन्यात येऊन गेलेल्या पुरामुळे शिरोळ तालुक्यातील सुमारे चार हजार हेक्टरमधील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अदांज आहे. प्राथमिक अदांजानुसार शिरोळ तालुक्यात पुरामुळे हजारो शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६७१ हेक्टरमधील जिरायत पिके व ३३२७ हेक्टरमधील बागायत पिकांचा समावेश आहे.
यामध्ये अंदाजे सोयाबीन १५२ हेक्टर, भुईमुग ४०५ हेक्टर, मुग-उडीद व इतर पिके ११० हेक्टर, भात ४ हेक्टर, ऊसपिक २८६३ हेक्टर, भाजीपाला ४१२ हेक्टर, केळी ५२ हेक्टर क्षेत्राला पुराचा फटका बसला आहे. शिरोळ तालुक्यात जून, जुलै महिन्यात तीन-चार वेळा कृष्णा- पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. मात्र शेतशिवारात शिरण्यापुर्वीच पाणी ओसरले. ऑगस्ट महिन्यातही १५ तारखेपर्यंत दोन्ही नद्यांचे पाणी पात्रात विसावलेले होते. यामुळे शिरोळ तालुक्याची पुरापासून सुटका झाली असेच सर्वांना वाटले होते. मात्र १६ ऑगस्टपासून जिल्ह्यासह धरणपाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु झाली. बहुतांशी धरणे अगोदरच भरल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला.
मुसळधार पाऊस व धरणातील विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली. दिवसभरात १२ तासाला तब्बल ८ ते ९ फुटाने पाणी वाढत राहिले आणि पाहता पाहता कृष्णा- पंचगंगा, दुधगंगा, वारणा नंद्याचे पाणी पात्राबाहेर पडून गावागावातील शेतशिवारात शिरले. पुराच्या पाण्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांना आपल्या मगरमिठ्ठीत घेतले. तर दुसरीकडे ओढे, नाले, रस्ते पार करुन पाणी नागरी वस्तीत शिरले. यामुळे पुरबाधित नागरिकांना आपल्या कुटुंबातील सदस्य व जनावरासह सुरक्षित ठिकाणी स्थंलातर करावे लागले. चार – पाच दिवसाच्याच पावसाने शिरोळ तालुक्यात महापूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. जिकडे पहाल तिकडे शेतशिवारात पाणीच पाणी दिसत होते.
सध्या शिरोळ तालुक्यातील गावागावात पुरामूळे बाधित पिक क्षेत्राचे कृषी विभागाकडून पंचनामे सुरु आहेत. पूर ओसरुन आठ दिवस झाले तरी, शेतशिवारातील पिकक्षेत्रात सरीतून अजूनही पाणी साचून राहीले आहे. पूर ओसरल्यानतंरही अजून अधुनमधून जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे नुकताच ऊसरोपे, ऊसकांडी लावून ज्यानी लागण केली आहे.त्यांच्यापुढे दुबार ऊसलागणीचे संकट निर्माण झाले आहे. कारण सरीतून पाणी साचून राहील्यामुळे अतिपाण्यामुळे ऊसरोपे कुजून जात आहेत. तसेच काढणीस आलेला भुईमुग पिवळा धमक पडला आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. यामुळे अजुनही बाधित क्षेत्रात वाढ होवून पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची आकडेवारी वाढू शकते.