कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
वाठार तर्फ वडगावमधील साडेसात एकर जागा बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला भाडेपट्टीवर देण्यात आली. मात्र, या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत साखळी उपोषण सुरू केलं होतं. अखेर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना हा आदेश मागे घ्यावा लागला. ही जागा परत ग्रामपंचायतीला देण्यात आली.
वाठार तर्फ वडगाव (ता हातकणंगले) येथील साडेसात एकर गायरान जमीन बाळासाहेब माने शिक्षण संस्थेला देण्यात आली. यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. गावकऱ्यांनी आंदोलन सुरु केले. उपोषण सुरू केले. अखेर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडगा काढण्यात आला. गावकऱ्यांनी केलेल्या कडाडून विरोधानंतर त्या संस्थेनं जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या जमिनीवरून झालेल्या वादात एकमेकांना डिवचण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. माजी आमदार राजू बाबा आवळे आणि विद्यमान आमदार अशोकराव माने यांच्यामध्ये झालेली खडाजंगी झाली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि खासदार धैर्यशील माने यांच्यामध्येही कलगीतुरा रंगला. त्यामुळे गावच्या गायरान जमिनीवरून झालेला वाद चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
या जमिनीबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलावण्यात आली. मात्र, या बैठकीमध्येच माजी आमदार आणि विद्यमान आमदारांमध्ये कोल्हापुरातील जागेवरून चांगलाच वाद रंगला.
राजू बाबा आवळे यांनी या जागेवरून बोलताना आमदार अशोकराव माने यांना घेरत बापू कोल्हापुरात जाऊन जागा का काढून घेता? अशी विचारणा केली. यावेळी अशोकराव माने यांनी हा विषय इथं काढायचा नाही. मी ती जमीन घेतलेली नाही, असं प्रत्युत्तर अशोकराव माने यांनी दिलं. यावेळी एका गावकऱ्याने सुद्धा अशोकराव माने यांना कोंडीत पकडले. तुमच्या प्रचारासाठी आम्ही गुडघ्याच्या वाट्या झिजवल्या. मात्र, तुम्ही आमची दखल घेतली नाही. बापू हळूच गावात येतात. कुठेतरी बसतात आणि भजी खाऊन जातात. मात्र, आपल्या उपोषणाला भेट द्यायला त्यांना वेळ मिळाला नाही.’ यावेळी अशोकराव माने निरुत्तर झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, या बैठकीत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्यातही चांगलाच वाद झाला. माने यांच्यावर गावकऱ्यांनी सुद्धा हल्लाबोल केला. ‘दहीहंडीच्या कार्यक्रमाला जायला तुमच्याकडे वेळ आहे. मात्र, गावकऱ्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला वेळ नाही. तुमच्या निवडणुकीत आम्ही रॅली काढून तुम्हाला मतदान केले. पण, तुम्ही गावात फिरकला सुद्धा नाही,’ अशा शब्दांत ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील माने यांना सुनावले. यावर खासदार माने म्हणाले की, ‘मी दिल्लीमध्ये अधिवेशनात होतो. त्यामुळे बैठक घेता आली नाही. मात्र, मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.’ त्यानंतर ग्रामस्थांनी आक्षेप घेत माने यांना चांगलेच धारेवर धरले.
मात्र वाठार तर्फ वडगाव येथील जमीन लाटण्याचा प्रयत्न आमदारांचा अयशस्वी ठरला. ग्रामस्थांनी वेळीच जागृत होऊन याला विरोध केला. उपोषण सुरु केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे याना निवेदन दिले. एकजूट कायम ठेवली. याबाबत ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी येडगे यांनी बोलावली . या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशास कडाडून विरोध केला. अखेर जिल्हाधिकारी येडगे यांनी ही जमीन परत गावाच्या नावावर केली.