मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या आनंदात महाराष्ट्रात गौरी पूजनालाही विशेष स्थान आहे. भाद्रपद शुद्ध सप्तमी तिथीला गौरी पूजनाची परंपरा आहे. या वर्षी रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी गौरी आवाहन, सोमवार १ सप्टेंबर रोजी गौरी पूजन तर मंगळवार २ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन पारंपरिक पद्धतीने होणार आहे.
गौरी पूजनाची सामग्री
गौरी पूजनासाठी आवश्यक वस्तूंमध्ये भगवान शिवशंकर, दुर्गा माता आणि गणेश मूर्ती, स्नानासाठी ताम्हन, वस्त्र व अलंकार, हळद, कुंकू, चंदन, गंगाजल, अक्षता, दिवा, तेल, कापूस, धूपबत्ती, अष्टगंध, फुले, सुपारीची पाने, आंब्याची पाने यांचा समावेश होतो. नैवेद्यासाठी फळे, दूध, मिठाई, नारळ, पंचामृत, सुकामेवा, साखर, पान, दक्षिणा तसेच इतर पारंपरिक पदार्थ अर्पण केले जातात.
ज्येष्ठा गौरी व्रताची पौराणिक कथा
पौराणिक आख्यायिकेनुसार, असुरांच्या त्रासाने महिलांनी गौरीला शरण जाऊन प्रार्थना केली. त्यावर गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. त्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात, अशी श्रद्धा आहे.
गौरी पूजन विधी
गौरी पूजनाच्या पद्धती महाराष्ट्रभर वेगवेगळ्या आढळतात. काही ठिकाणी मातीची किंवा धातूची प्रतिमा वापरतात, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच छोटे खडे आणून त्यांचे पूजन करतात. कुठे पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचे मुखवटे बसवले जातात, तर काही ठिकाणी सुगंधी वनस्पतींची रोपे एकत्र बांधून प्रतिमा तयार केली जाते.
मूर्तीला साडी-चोळी नेसवून अलंकारांनी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तावर प्रतिष्ठापना केली जाते. घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढून प्रत्येक पावलावर गौरीला थांबवत घरात प्रवेश दिला जातो. स्थापनेनंतर महापूजनात पानफुलांची आरास केली जाते.
गौरी पूजनातील नैवेद्य व भोग
ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीला महानैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. माहेरी आलेल्या गौरीला माहेरवाशीण पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. त्यात १६ प्रकारच्या भाज्या, १६ प्रकारच्या कोशिंबिरी, १६ प्रकारच्या चटण्या, १६ प्रकारची पक्वान्ने व फराळाचे पदार्थ असतात. या दिवशी संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ करून महिलावर्ग एकत्र येऊन सणाचा आनंद घेतात.
गौरी पूजन हा केवळ धार्मिक विधी नसून सौभाग्य, समृद्धी आणि परिवाराच्या मंगलकामनेसाठी केलेला एक सुंदर पारंपरिक उत्सव आहे.
———————————————————————————————–
Be the first to write a review