spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeअध्यात्मगणेशवाडीतील गणेशोत्सवास ऐतिहासिक वारसा

गणेशवाडीतील गणेशोत्सवास ऐतिहासिक वारसा

श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेला १०२ वर्षे पूर्ण

कुरुंदवाड : अनिल जासुद

गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील गणेशोत्सवाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे सन १९२३ मध्ये स्थापन झालेल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेला १०२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजतागायत येथे पारंपारिक पध्दतीनेच गणेशोत्सव साजरा केला जातो.

सन १९१६ चा काळ. सारा देश स्वांतत्र्यांच्या चळवळीने पेटून उठला होता. अशावेळी देव, देश अन धर्माची शिकवण देण्यासाठी गणेशवाडीत लोकसेवा संघ वाचनालय व व्यायामशाळा स्थापन झाली. लोकमान्य टिळक कर्नाटक दौर्‍यावर असताना कर्नाटक सिंह गंगाधर देशपांडे यांच्या प्रयत्नाने त्यांना संघाने गणेशवाडीत आणले. सन १९१७ मध्ये येथे टिळकांची मोठी सभा झाली. अदांजे तीन हजाराहून अधिक लोक या सभेस उपस्थित होते. यावेळी गणेशवाडीकरांनी स्वांतत्र्य चळवळीस १५० रुपयाची देणगीही दिली. या भेटीत लोकमान्य टिळकांनी लोकसेवा संघास गणेशोत्सवाची प्रेरणा दिली. यावेळी संघाचे अध्यक्ष असलेले श्रीपाद मास्तर मराठे यांच्या पुढाकाराने वाचनालयाच्या कार्यालयात गणेशवाडीचा पहिला गणेशोत्सव साजरा झाला. सलग तीन- चार वर्षे संघामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सन १९२३ मध्ये गणेशवाडीत याला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे, स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळावे, स्वांतत्र्यांच्या प्रेरणेने गावातील तरुण एकत्र यावेत यासाठी हा उत्सव सार्वजनिक करण्यात येत होता.

सन १९२३ मध्ये गावातील मुख्य चौकात गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या नावे सुरु करण्यात आला. अल्पावधीतच या उत्सवास भव्य स्वरुप प्राप्त झाले. सारा गाव एक झाला. लेझीम, सभा, मेळावे, नाटक यांनी सारा गाव दुमदुमून गेला. १९५० ते १९८० च्या दशकात विविध सामाजिक, कौटुबिंक नाटकांनी हा उत्सव वेगळ्याच अशा ऊंचीवर नेऊन ठेवला. गणेशवाडीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मेळा पथकांनी पुण्यातील उत्सवही गाजवला.

अँड. राघवेंद्र गोरवाडे, आप्पासाहेब गावडे, चिंतामणी भट यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते आजही तितक्याच उत्सहाने, राष्ट्रीय सेवेची भावना जोपासत पांरपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. पहिला गणेशोत्सव ज्या मखरात साजरा झाला. ते मखर लोकसेवा संघाने आजही सुस्थितीत जतन करुन ठेवले आहे. लोकसेवा संघ आजही सर्व परपंरा,गावातील सांस्कृतिक ,राष्ट्रीय सेवेचा,राष्ट्र भक्तीचा वारसा जपत गणेशोत्सव साजरा करतो. याचा सार्थ अभिमान गावास व संस्थेस आहे. प्रत्येक घराघरात, प्रत्येक व्यक्तीला देव, देश अन धर्माची शिकवण देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील सुमारे २५ गणेश मंडळे स्वागत कमानीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देत देव, देश आणि धर्मसेवेचे कार्य निष्ठेने बजावत आहेत.

सन १९२३ मध्ये स्थापना झालेल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेला सन २०२३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. या शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासह महिलासाठी विशेष कार्यक्रम, मान्यवरांचे किर्तन, प्रबोधनात्मक व्याख्यान, भक्तीगीते, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गणेशोत्सवानिमित्त ही संस्था कोणत्याही स्वरुपाची वर्गणी गोळा करीत नाही. जे काही भक्त, शिवाय स्वेच्छेने देणगी देतात या वर्गणीतून गणेशोत्सव भक्तीमय वातावरणात, उत्साहाने साजरा केला जातो. संस्थेच्या “श्रीं”ची मूर्ती  शाडू पासून बनविलेली असते. “श्रीं”चे आगमन व विसर्जन हे पालखीतूनच केले जाते. यामुळे पारंपारिकतेचा वारसा आजही जपला जात आहे. – बळवंत गोरवाडे, गणेशवाडी.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments