बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणी प्रमाणे अगदी लहान वयातच स्वयं प्रेरणेने डेविड लो यांनी व्यंग चित्रे रेखाटायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षापासूनच स्थानिक साप्ताहिक वर्तमानपत्रात व्यंगचित्रे छापून येण्यास सुरुवात झाली. वयाच्या १७ व्या वर्षीच एक स्वतंत्र कलाकार म्हणून करियर ला सुरवात केली अश्या या महान व्यंगचित्रकाराचा जन्म 7 एप्रिल 1891 रोजी न्यूझीलंडमध्ये झाला नंतर त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले. त्यानिमित्त त्यांच्या निर्भीड कामाचे स्मरण.
त्यांचे पूर्ण नाव सर डेविड अलेक्झांडर सेसिल लो (Sir David Alexander Cecil Low) त्यांना लहानपणीच चित्रकलेची आवड निर्माण झाली आणि लवकरच व्यंगचित्रकलेत त्यांनी नैपुण्य मिळवले. लो यांनी 1908 मध्ये न्यूझीलंडच्या ‘Canterbury Times’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे ते ऑस्ट्रेलियामधील ‘The Bulletin’ या प्रसिद्ध पत्रिकेत काम करू लागले.त्यांनी ऑस्ट्रेलिया चे लेबर पंतप्रधान ‘बिली’ ह्युजेस यांचे काही अत्यंत यशस्वी आणि धिटाईपूर्ण व्यंगचित्रे तयार केली ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळायला सुरवात झाली. त्यांच्या भेदक राजकीय व्यंगचित्रांमुळे ते चर्चेत आले. 1919 मध्ये ते ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले आणि ‘The Star’ आणि ‘Evening Standard’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत झाले. या वृत्तपत्रांनीही त्यांना भरपूर स्वातंत्र्य दिले. त्यांनी हिटलर, मुसोलिनी आणि स्टालिन यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीविरूद्ध वेळोवेळी कठोर व्यंगचित्रे रेखाटली, जी जगभर प्रसिद्ध झाली. त्यांच्या व्यंगचित्रांमुळे नाझी जर्मनीने त्यांच्यावर बंदी घातली आणि हिटलरने त्यांचा उल्लेख “धोकादायक व्यक्ती” म्हणून केला. म्हणजेच हिटलरच्या इंग्लंड काबिज केल्यावर ‘एलिमिनेट’ करण्यात येणा-या व्यक्तींच्या नावाच्या हिटलिस्ट वर त्यांचे नाव पहिलं होत.
लो यांच्या व्यंगचित्रांनी हिटलर आणि त्याच्या नाझी राजवटीवर कठोर टीका केली. त्यांचे “Very Well, Alone” हे चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनच्या एकट्या संघर्षाचे चित्रण करणारे प्रसिद्ध व्यंगचित्र होते. त्यांनी “The Toad” नावाचे एक लोकप्रिय पात्र तयार केल, जो हुकूमशाही विरोधी होता. डेविड लो यांची शैली स्पष्ट, निर्भीड आणि राजकीय टीकेने परिपूर्ण होती. त्यांनी मुख्यतः हिटलर, मुसोलिनी, स्टालिन, चर्चिल, आणि इतर अनेक नेत्यांवर व्यंगचित्रे रेखाटली.
त्यांची काही प्रसिद्ध व्यंगचित्रे:
1. “Very Well, Alone” (1940) – दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन एकटा उभा असल्याचे दर्शवणारे व्यंगचित्र.
2. “Rendezvous” (1939) – हिटलर आणि स्टालिन यांच्यातील नाझी-सोव्हिएत कराराचे (Molotov-Ribbentrop Pact) उपहासात्मक चित्रण.
3. “The Toad” – हुकूमशाहीविरोधी पात्र.
1962 मध्ये सर हा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचे कार्य आजही व्यंगचित्रांच्या जगात सत्य आणि निर्भीडपणाचे प्रतीक मानले जाते. 19 सप्टेंबर 1963 रोजी लंडनमध्ये त्यांचे निधन झाले.
त्यांचे व्यंगचित्र आजही इतिहासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांचे दस्तऐवजीकरण मानले जाते. व्यंगचित्रकलेतील “अधिकृत सत्यवाद” निर्माण करणारे पहिले प्रमुख व्यंगचित्रकार. त्यांचे काम आजही राजकीय आणि ऐतिहासिक अभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहे.
डेविड लो हे फक्त एक व्यंगचित्रकार नव्हते, तर ते एक निर्भीड पत्रकार होते, ज्यांनी आपल्या कुंचल्याद्वारे हुकूमशाहीला आव्हान दिले. त्यांच्या व्यंगचित्रांनी इतिहासावर प्रभाव टाकला आणि जगभरात राजकीय व्यंगचित्रकलेला नवी दिशा दिली. एक व्यंगचित्रकार कुंचल्याने उत्तम पत्रकारिता करून त्याचा राजकीय क्षेत्रात सुद्धा प्रभाव टाकून दाखल घ्याला लावू शकतो. हे सर डेविड लो यांनी सिद्ध केले होते आणि म्हणूनच महाराष्ट्रातील शिवसेनेचे सेनाप्रमुख व्यंगचित्रकार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा सर डेविड लो यांच्या पासून प्रभावित होते.
“व्यंगचित्र हे फक्त कला नाही, तर सत्य सांगण्याचे एक धारदार हत्यार आहे” – सर डेविड लो
व्यंगचित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, प्रकाराचे किंवा कृतीचे व्यंगावर , अतिरेकावर, त्रुटीचे अचूक ओळखून केलेले सादरीकरण. सामान्यतः, विषयाचे अथवा व्यक्तीमत्वातील प्रमुख वैशिष्ट्याचे अतिशयोक्तीपूर्ण सादरीकरण केले जाते, किंवा प्राणी, पक्षी किंवा भाज्यांची वैशिष्ट्ये मानवाच्या काही भागांऐवजी वापरली जातात किंवा प्राण्यांच्या कृतींशी साधर्म्य दाखवले जाते म्हणजे न बोलत ही समाजातील व राजकीय वा सत्तेतील सरकारच्या चुकीच्या निर्णया वर, व्यंगा वर शालीतून तून जोडे मारणे. थोडीफार चित्रकला व उत्तम शोधक नजर असेल तर सध्याच्या पिढीला यात एक उत्तम करियर करता येऊ शकते. बदलत्या जगाच्या पाठोपाठ तुम्ही नुसत्या पारंपरिक म्हणजे वर्तमानपत्रे,सप्ताहिके मासिके यांच्या साठी काम न करता टि व्ही चॅनेल्स,ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्यंगचित्रकार (कार्टूनिस्ट) म्हणून सुद्धा काम करू शकता.
व्यंगचित्रकार म्हणून करियर निवडण्याचे फायदे म्हणजे कल्पना आणि विचार चित्रांच्या माध्यमातून व्यक्त करता येते. त्यातून तुम्ही प्रसिद्धी मिळवु शकता. विविध क्षेत्रात काम करू शकता जसे की राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रसारमाध्यमे. सध्या इंटेरियर डिझाईनिग, मध्ये सजावटीसाठी हॉटेल्स रेस्टॉरंट कॅफे मध्ये व्यंगचित्रे रेखाटुन घेतली जातात. त्याद्वारे चांगले स्वतंत्र काम करणाऱ्या व्यंगचित्रकार ( कार्टूनिस्ट ) यांचे चांगले अर्थार्जन होत आहे. व्यंगचित्रकार होण्यासाठी तुम्हाला चित्रकला आणि रेखाटनाची आवड असणे आवश्यक आहे. राजकीय,सामाजिक आणि इतर विषयांची चांगली माहीती असणे आवश्यक आहे. तुमच्यामध्ये विनोद व कल्पना करण्याची चंगली क्षमता असणे आवश्यक आहे. विनोदी बुद्धी चांगली कल्पना सुचणे आणि रेखाटण्याची हातातील जादू यामुळे तुम्ही नक्कीच सुंदर व्यंगचित्रकार म्हणून नावारूपास येऊ शकता. दुसरे महत्वाचे तुम्ही तुमचे इतर काम व्यवसाय नोकरी सांभाळत सुद्धा ही कला जोपासू शकता. शेवटी थोर लोकानी म्हंटले आहे की ज्याच्या कडे कला आहे तो कधी उपाशी मरत नाही. विशेष म्हणजे औपचारिक कला शिक्षण आवश्यक नाही,परंतु कला आणि डिझाईन मधील पदवी किवा डिप्लोमा तुम्हाला मदत करू शकते.
भारतातील व महाराष्ट्रातिल काही प्रसिद्ध व्यंग चित्रकार
आर. के. लक्ष्मण: प्रसिद्ध व्यंगचित्रकार, ज्यांनी ‘कॉमन मॅन’ नावाचे लोकप्रिय पात्र तयार केले.
शि. द. फडणीस: प्रसिद्ध मराठी व्यंगचित्रकार, ज्यांनी अनेक वर्षांपासून व्यंगचितत्रातून समाजाला मार्गदर्शन केले आहे.
प्रभाकर वाईकर: प्रसिद्ध मराठी व्यंगचित्रकार,ज्यांची रेखाटन शैली वेगळी आहे.
प्राण : चाचा चौधरी,बिल्लू, पिंकू, साबू या मासिकतील व्यंगचित्राचे जनक.
बाळासाहेब ठाकरे (शिवसेना प्रमुख) : राजकीय क्षेत्रात आपल्या व्यंगचित्रकारीतेने विरोधकांची आपल्या शैलीत टर्र उडवण्यात महिर होते.