कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मिशन लक्षवेध अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथील स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे उद्घाटन व संरक्षक भिंत बांधकामाचे भूमीपूजन समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांनी दिली आहे.
विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथील १६.३५ एकर जागेमध्ये विविध क्रीडा विषयक सुविधा विकसित करण्यात आलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील खेळाडूंनी अधिक पदके संपादन करण्यासाठी खेळाडू केंद्रीत विविध बाबी विचारात घेवून मिशन लक्षवेध योजना राबविण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे खेळाडूंसाठी स्पोर्टस सायन्स सेंटर स्थापित करण्यात आलेले आहे.
मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन – २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून संकुलातील स्पोर्टस सायन्स सेंटरचे उद्घाटन व विभागीय क्रीडा संकुलासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत होणाऱ्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भुमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार आहेत.