मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आर्थिक वर्ष २०२४-२६ मध्ये देखील वस्तू आणि सेवा कर संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने आघाडी कायम राखली आहे. यासोबतच गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्ये देखील सर्वाधिक जीएसटी संकलन करणाऱ्या राज्यांमध्ये अग्रस्थानी आहेत.
राज्य आघाडीवर का :
-
महाराष्ट्रने देशात सर्वाधिक जीएसटी गोळा करून आपली पारंपरिक आघाडी कायम ठेवली आहे. मुंबईसारख्या औद्योगिक शहरामुळे राज्याला मोठ्या प्रमाणावर कर संकलन करता येते.
-
गुजरात हे राज्य औद्योगिकदृष्ट्या बलाढ्य असून, व्यापार व उत्पादन क्षेत्रातील प्रगतीमुळे जीएसटी संकलनात मोठा वाटा उचलत आहे.
-
कर्नाटकमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सेवा उद्योगांच्या जोरावर जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. बंगळुरू हे आर्थिक केंद्र म्हणून उदयास आले आहे.
-
तामिळनाडूमध्ये उत्पादन उद्योग, वाहननिर्मिती आणि निर्यात यामुळे कर संकलनात चांगली वाढ झाली आहे.
-
उत्तर प्रदेशनेही आपल्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांमुळे जीएसटी संकलनात मोठी उडी घेतली असून, हे राज्य आता जीएसटी गोळा करणाऱ्या आघाडीच्या पंक्तीत सामील झाले आहे.
भारतासाठी कर वसुली हा सरकारसाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आयकर विभाग आणि अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आर्थिक वर्ष २०२४-२६ मध्ये सुद्धा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही ५ राज्ये सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर गोळा करणाऱ्या राज्यांमध्ये आघाडीवर आहेत.
जीएसटी गोळा करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या राज्याने एकूण ३.८ लाख कोटी रुपयांची कर वसुली केली. तर फक्त एप्रिल २०२५ मध्ये हा आकडा ४१,६४५ कोटी रुपयांवर पोहोचला. जरी या वर्षी वाढीचा दर थोडा कमी होऊन 11 टक्के झाला असला तरी, आजही महाराष्ट्र देशात सर्वाधिक कर भरणाऱ्या राज्यांच्या यादीत सर्वात पुढे आहे. मुंबईसारखी आर्थिक राजधानी आणि मोठे उद्योग यामुळे महाराष्ट्राचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे.
हे कर उत्पन्न राज्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असते. या पैशांचा वापर पायाभूत सुविधा (रस्ते, वीज), आरोग्य सेवा, शिक्षण आणि इतर कल्याणकारी योजनांवर केला जातो. अशाप्रकारे, जास्त कर गोळा होणे हे त्या राज्याच्या आर्थिक प्रगतीचे आणि लोकांच्या विकासाचे प्रतीक मानले जाते.
——————————————————————————————