Team India's players continue to dominate the rankings released by the ICC. Three Indian players are included in the top 5.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत भारताचा तरुण स्टार शुभमन गिल ( ७८४ पॉईंट्स ) अव्वल स्थानावर कायम आहे. त्याच्याच खालोखाल भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( ७५६ ) दुसऱ्या तर पाकिस्तानचा बाबर आझम ( ७३९ ) तिसऱ्या स्थानी आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( ७३६ ) चौथ्या स्थानावर आहे.
भारतीय टीमने बऱ्याच काळापासून वनडे सामने खेळलेले नसतानाही गोलंदाजांच्या क्रमवारीतही भारताची दमदार उपस्थिती कायम आहे. कुलदीप यादव ( ६५० पॉईंट्स ) तिसऱ्या आणि रवींद्र जडेजा ( ६१६ ) नवव्या क्रमांकावर आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्ट व टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी वनडे फॉरमॅटमध्ये दोघंही सक्रिय असून त्यांनी शेवटची वनडे खेळी फेब्रुवारी-२०२५ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये केली होती.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स गमावून ४३१ धावांचा विक्रमी डोंगर उभारला. या सामन्यात ट्रॅव्हिस हेड ( १४२ ), मिचेल मार्श ( १०० ) आणि कॅमरून ग्रीन ( नाबाद ११८ ) यांनी शतकं झळकावली. त्यांच्या तुफानी खेळीचा थेट परिणाम क्रमवारीत दिसून आला आहे. हेड आता ११ व्या, मार्श ४४ व्या, ग्रीन ७८ व्या स्थानी पोहोचले आहेत. याशिवाय जॉश इंग्लिसही झेप घेत ६४ व्या क्रमांकावर गेला आहे.
गोलंदाजांच्या यादीतही चुरस वाढली आहे. श्रीलंकेचा महीश तीक्षणा आणि दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज हे ६७१ पॉईंट्ससह संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी २८ व्या, ऑस्ट्रेलियाचा सीन एबॉट ४८ व्या आणि नॅथन एलीस ६५ व्या स्थानी पोहोचले आहेत.
भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची क्रमवारीतील मजबूत पकड आणि ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती कामगिरीमुळे आगामी काळात वनडे क्रिकेटमध्ये आणखी रंगत वाढणार आहे.