मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
लंडनमधील मराठी बांधवांना स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक व सामाजिक केंद्र मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळाले आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला ‘चर्च ऑफ इंग्लंड’ ची इमारत खरेदी करून तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला असून, गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मराठीजनांना मिळालेली ही मोठी भेट मानली जात आहे.
९३ वर्षांची परंपरा
भारताबाहेरील आणि युनायटेड किंगडम मधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी एक असलेले महाराष्ट्र मंडळ, लंडन १९३२ मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी स्थापन केले होते. लंडन व परिसरातील मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणे हा या मंडळाचा उद्देश होता. गेल्या ९३ वर्षांपासून मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे. सध्या लंडन व परिसरातील एक लाखाहून अधिक मराठी बांधव या मंडळाशी जोडले गेले आहेत.
आठवडाभरात मागणी पासून निर्णयापर्यंत
मंडळाची वास्तू स्थापने पासूनच भाडेतत्त्वावर होती. त्यामुळे स्वतःच्या मालकीचे भवन असावे, अशी मागणी मराठीजनांकडून कायम होती. गेल्या आठवड्यात मंडळाच्या प्रतिनिधींनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. या मागणीवर पवार यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
सांस्कृतिक आदानप्रदानाला चालना
‘महाराष्ट्र भवन’ हे युनायटेड किंगडम व महाराष्ट्र शासन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणारे व्यासपीठ ठरणार आहे. येथे मराठी साहित्य, नृत्य, संगीत, सण-उत्सव यांच्यासोबतच आंतरराष्ट्रीय परिषद, भाषा वर्ग व कार्यशाळांचे आयोजन करता येईल. त्यामुळे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार जागतिक स्तरावर अधिक बळकट होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लंडन मधील मराठी जनांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न साकार होणार असून, महाराष्ट्र मंडळाने शासनाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
————————————————————————————————