उद्यापासून ५०% आयात शुल्क लागू

भारतावर अमेरिकेचा टॅरिफचा घाव

0
270
A total import duty of 50 percent will be imposed on many products from India to the United States from August 27, 2025.
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिकेने भारतातून होणाऱ्या आयातीवर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा निर्णय अंतिम केला असून, त्यासंदर्भातील अधिसूचना आज सकाळी जारी करण्यात आली. त्यामुळे २७ ऑगस्ट २०२५ पासून भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या अनेक उत्पादनांवर एकूण ५० टक्के आयात शुल्क लागू होणार आहे.
हा निर्णय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतला असून, भारताने रशियाकडून चालू ठेवलेल्या तेल खरेदीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी ७ ऑगस्ट रोजी जाहीर केले होते की, भारतावर टॅरिफ वाढवून २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात येईल, कारण भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करतो आणि यामुळे युक्रेन युद्धाला अप्रत्यक्षपणे पाठबळ मिळत आहे. या निर्णयामुळे पुतिन चर्चेसाठी मजबूर होतील, असा ट्रम्प यांचा दावा होता. त्यासाठी भारताला २१ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
तीन अटी पूर्ण केल्यास टॅरिफमधून दिलासा
तथापि, अमेरिकेने काही वस्तूंना या वाढीव शुल्कातून वगळण्याची मुभा दिली आहे. यासाठी खालील तीन अटी पूर्ण करणे आवश्यक आहे
  • माल लोडिंगची अट : जर भारतातून अमेरिकेकडे पाठवलेला माल २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १२:०१ (EDT) पूर्वी जहाजावर लोड होऊन रवाना झाला असेल, तर त्यावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लागू होणार नाही.
  • एंट्रीची अट : तो माल अमेरिकेत १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १२:०१ (EDT) पूर्वी विक्रीसाठी पोहोचला असेल, तरी त्याला अतिरिक्त शुल्कातून सूट मिळेल.
  • सर्टिफिकेटची अट : भारताने अमेरिकी कस्टम विभागासमोर (CBP) सिद्ध करावे लागेल की, तो माल इन-ट्रान्झिट सवलतीअंतर्गत येतो. यासाठी HTSUS heading 9903.01.85 या नव्या कोडखाली डिक्लेरेशन करणे बंधनकारक आहे.
भारताचा ठाम पवित्रा
अमेरिकेच्या या दबावानंतरही भारताने आपला रशियासोबतचा व्यापार थांबवलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते की, भारताचे धोरण शेतकऱ्यांचे आणि छोट्या उद्योगांचे हित जपणे हेच प्राधान्य आहे. त्यामुळे रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करणे हे भारताच्या हितासाठी आवश्यक आहे, असा भारताचा ठाम पवित्रा आहे.
या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या काही वस्तूंवर एकूण ५० टक्के टॅरिफचा फटका बसणार आहे. विशेषत: कृषी उत्पादनं, वस्त्रोद्योग, औद्योगिक साहित्य यावर परिणाम होऊ शकतो. भारतीय निर्यात दारांसमोर अडचणी वाढणार असून, भारत-अमेरिका व्यापारसंबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
———————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here