सडोली खालसा : प्रसारमाध्यम न्यूज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर दिवंगत नेते पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील व राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात नवीन समीकरणे निर्माण केली आहेत.
अजित पवार – पी. एन. पाटील साहेब आपल्याला इतक्या अचानक सोडून जातील, असे वाटले नव्हते. मात्र राहुल भैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपल्या कुटुंबाला व कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. त्यांनी पक्षात प्रवेश करून चूक केली असे कुणालाही वाटू देणार नाही. राज्याच्या विकासासाठी, शेतकरी आणि तरुण-तरुणी मागे राहू नयेत म्हणून आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत.”
ते पुढे म्हणाले, “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वप्रथम बेरजेचे राजकारण सुरू केले. सर्वधर्मसमभावाच्या विचारावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे लोक आश्वासक चेहऱ्यांप्रमाणे पाहतात. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होईल.”



