कुरुंदवाड : प्रतिनिधी
गेले दोन तीन दिवस जिल्ह्यासह धरण पाणलोटक्षेत्रात पावसाने दिलेली पूर्ण उघडीप, कोयना, वारणा धरणातून पुर्णतः बंद करण्यात आलेला विसर्ग, राधानगरी धरणाचे सर्व स्वंयचलित बंद झालेले दरवाजे यामुळे कृष्णा- पंचगंगेची पाणी पातळी काल रात्री पासून ओसरु लागली आहे. परिणामी शिरोळ तालुक्यावरील महापुराचे संकट टळले आहे.
गेले दोन तीन दिवस पावसाने सर्वत्र उघडीप दिली आहे. यामुळे विविध धरणात पावसामुळे होणारी पाण्याची आवक बंद झाली आहे. परिणामी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारपासून कोयना व वारणा धरणातून करण्यात येणारा विसर्ग पुर्णतः बंद करण्यात आला. तर राधानगरी धरणाचेही सर्व स्वंयचलित दरवाजे बंद झाले आहेत. याचाच परिपाक म्हणजे जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यातील कृष्णा – पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत शुक्रवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात घट होत गेली आहे.
तालुक्यात कृष्णा – पंचगंगेचा पूर ओसरु लागल्याने पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. चार दिवसापुर्वी नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने हजारो पूरग्रस्तांना कुटुंबातील आबालवृद्ध सदस्य व घरातील जनावरासह स्थंलातर करावे लागले होते. यामुळे पूरग्रस्तांना फार मोठा मानसिक त्रास सोसावा लागला होता. आता सर्वत्र पुराचे पाणी ओसरु लागल्याने सर्वच पूरग्रस्तांच्या चेहर्यावरील चिंता दुर झाली आहे.
दरम्यान काल शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता नृसिंहवाडी येथे पाणी पातळी ६२ फुट ३ इंच होती. आज सकाळी आठ वाजता ६१ फुट ६ इंचावर खाली आली आहे. राजापूर धरणाजवळ काल सांयकाळी ५१ फुट ४ इंच होती, ती आज सकाळी ५१फुटावर आली आहे. अशाचप्रमाणे कृष्णा पुल, कराड येथे १४फुट २ इंचावरुन १० फुट १० इंचावर, बहे पुल येथे ८ फुट ११ इंचावरुन ७ फुटावर,ताकारी पुल येथे ३६ फुट ५ इंचावरुन २५ फुटावर, भिलवडी पुल येथे ३९फुट ६ इंचावरुन ३० फुट २ इंचावर, आयर्विन पुलाजवळ ४० फुटावरुन ३४ फुटावर, राजाराम बंधार्याजवळ ४२ फुट ५ इंचावरुन ४० फुट ११ इंचावर आली आहे. जिल्ह्यासह सर्वत्रच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने शिरोळ तालुक्यावर येऊ घातलेले महापुराचे संकट तुर्तास तरी टळले आहे.
आज शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणात ९९.६३ टीएमसी, वारणा धरणात ३१.९२टीएमसी, राधानगरी धरणात ८.२६ टीएमसी तर अलमट्टी धरणात ९६.८६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयनेच्या धरणपायथा विद्युत गृहातुन २१०० क्युसेक, वारणा धरण पायथा विद्युतगृहातुन १६०० क्युसेक, राधानगरी धरण पायथा विद्युत गृहातुन १५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. अलमट्टीतुन २,५०,००० क्युसेक व हिप्परगी धरणातुन २,३१,००० क्युसेक विसर्ग कर्नाटकात सोडण्यात येत आहे. कृष्णा- पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पूर ओसरु लागल्याने पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर शिरोळ तालूक्यावरील महापुराचे संकट टळले आहे.
तालुक्यातील कृष्णा -पंचगंगा नद्यांचा पुर ओसरु लागल्याने विविध रस्त्यावर आलेले पाणी आज दुपारपासुन कमी होईल.व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होवून सर्वत्र दळणवळण सुविधाही सुरळीत होईल.