कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शेंडा पार्क परिसरात सर्किट बेंच तसेच विविध शासकीय कार्यालये सुरू झाल्यामुळे या भागातील वाहतूक वाढणार आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी सायबर चौक आणि संभाजीनगर चौक येथे दोन उड्डाणपूल उभारणीसाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी दिली.
महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांनी शहरातील विविध प्रश्नांसंबंधी महापालिकेत बैठक घेतली.
महाडिक म्हणाले, “ महापालिकेने मुख्य रस्ते व पूल विस्तारीकरण, आरोग्य सुविधा यासाठी ठोस प्रस्ताव तयार करावेत. तसेच शहराच्या प्रवेश मार्गांवरील व महत्त्वाच्या चौकांवरील अतिक्रमणे काढून वाहतूक सुरळीत करण्याचे नियोजन केले पाहिजे.”
तिसऱ्या विकास योजनेतून विविध विकासकामे राबवली जाणार असून, महापालिका शाळांसाठी सीएसआर आणि शासन निधी उपलब्ध करणे, झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देणे, मोकाट जनावरांसाठी जागा उपलब्ध करून देणे, महानगरपालिकेच्या हेरिटेज इमारतींना निधी देणे, अशा विविध कामांचा समावेश आहे.
महाडिक म्हणाले, शहरांतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा अत्याधुनिक बनवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि महापालिका यांच्यात समन्वय बैठक घ्या. अमृत योजनेच्या कामाचे टप्पे तयार करून प्रभागनिहाय कामे पूर्ण करावीत. शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पुलांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही आमदार महाडिक यांनी दिल्या. गांधीनगर येथील केएमटीच्या जागेवर व्यापारी संकुल आणि बस डेपो उभारण्यासंदर्भात आराखडा व शहराचा तिसरा सुधारित विकास आराखडा तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या
दरम्यान, मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही महाडिक यांनी स्पष्ट केले.
—————————————————————————————–