पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंका दौ-यात रविवारी श्रीलंकेचे अध्यक्ष दिसनायके यांच्यासह अनुराधापुराला भेट दिली. अनुराधापुरा येथील ऐतिहासिक जय श्री महा बोधी मंदिरात पंतप्रधान मोदी नतमस्तक झाले. जाणून घेऊ यात काय आहे भारत-श्रीलंका संबंधातील अनुराधापुराचे महत्त्व व इतिहास.
सम्राट अशोकांची कन्या संघमित्रा महाथेरी यांनी बुद्ध धर्माची दिक्षा घेतली होती व त्या श्रीलंकेचे राजे देवंप्रिया तिस्सा यांच्या विनंतीवरून श्रीलंकेस गेल्या होत्या. सिलोनचा (त्यावेळेसच्या श्रीलंकेचे नाव) राजा देवंप्रिया हा सम्राट अशोकांचा समकालीन होता. त्यांच्या निमंत्रणावरून संघमित्रा व तिचा भाऊ महिदा (यानेही बौद्ध धर्माची दिक्षा घेतली होती व तोही बौद्ध भिक्खू बनला होता) दोघेही बौद्ध धर्माची शिकवण देण्यास श्रीलंकेस गेले होते.त्यानंतर श्रीलंका देशाने बौद्धधर्म स्विकारला.
सम्राट अशोकाच्या कन्या बौद्ध भिख्खू संघमित्रा यांनी श्रीलंकेस जाताना आपल्यासह श्रीलंकेसाठी एक विशेष ‘चेतनामय’ भेट घेतली होती. ही भेट म्हणजे गौतम बुद्धांना ज्या अंजिराच्या झाडाखाली बोध-साक्षात्कार झाला होता व ज्यास नंतर ‘बोधीवृक्ष’ म्हणून ओळखले जाते त्या बोधी वृक्षाची फांदी! ही पवित्र जिवंत बोधीवृक्षाची फांदी त्यांनी अनुराधापुरात लावून श्रीलंकेत बौद्ध धर्माची स्थापना केली. हे घडले होते ख्रिस्तपूर्व तिस-या शतकात.
संघमित्रा व महिदा यांनी सिलोनला गेल्यावर या बोधीवृक्षाच्या फांदीची अनुराधापुरा येथे लागवड केली. हाच वृक्ष आता जय श्री महा बोधी म्हणून ओळखला जातो. मानवाने रोपण केलेला हा जगातील सर्वात प्राचीन वृक्ष आहे अशीही मान्यता आहे. हे स्थान श्रीलंकेतील बौद्ध धर्मियांना अतिशय पवित्र आहे.अल्पावधितच संपूर्ण श्रीलंका बौद्ध मय झाले व अनुराधापुरा पुढे 1300 वर्षे सिलोनची धार्मिक व राजकीय राजधानी म्हणून प्रसिद्ध होती. 993 नंतरच्या आक्रमणात अनुराधापुरा चे महत्त्व कमी होउन दाट जंगलात लपून गेले.
श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून हे पवित्र स्थळ 200 किमी अंतरावर आहे. भारत व श्रीलंकेचे संबंध किती जुने आहेत व सांस्कृतिक दृष्ट्या दोन्ही देश किती जवळ आहेत याचा हा एक पुरावाच आहे. सोशल मेडीयावर दिलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या पोस्ट मधे ‘श्रीलंकेचे पंतप्रधान दिसनायके यांच्यासह जय श्री महा बोधी अनुराधापुरा चे दर्शन घेतले व श्रीलंकेतील बौद्ध धर्मियांच्य सर्वात पवित्र स्थळास भेट देणे ,नतमस्तक होणे हा एक विनम्र करणारा क्षण होता ‘ असे नमूद केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षांसह अनुराधापुराला भेट देवून दोन्ही देशातील या प्राचीन संबंधांना उजाळा दिला. अलिकडच्या काळात चीन आक्रमक झाल्यापासून भारताचे शेजारील देशांचे असलेले संबंध महत्वाचे झाले आहेत.